बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन देण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:09 AM2021-08-13T04:09:39+5:302021-08-13T04:09:39+5:30
नागपूर : मोठा डॉक्टर असल्याची बतावणी करून राष्ट्रीयीकृत बँकेत कार्यरत महिला अधिकाऱ्याचे शारीरिक-आर्थिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या प्रवीण देवा ...
नागपूर : मोठा डॉक्टर असल्याची बतावणी करून राष्ट्रीयीकृत बँकेत कार्यरत महिला अधिकाऱ्याचे शारीरिक-आर्थिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या प्रवीण देवा पाटील याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावला. न्यायमूर्ती रोहित देव यांनी हा निर्णय दिला.
आरोपीविरुद्ध रामटेक पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आरोपीचे आधीच लग्न झाले असून, त्याला दोन अपत्येही आहेत. पीडित महिला अधिकाऱ्याने लग्नाकरिता वैवाहिक वेबसाईटवर वैयक्तिक माहिती अपलोड केली होती. त्यावरून आरोपीने पीडित महिलेसोबत संपर्क साधला. तसेच, मी डॉक्टर आहे. पुणे व छत्तीसगड येथे स्वत:चे रुग्णालय चालवतो. आता भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथेही रुग्णालय उभारत आहे, अशी खोटी माहिती आरोपीने पीडित महिलेला देऊन तिचा विश्वास संपादित केला. त्यानंतर त्याने हळूहळू भेटणे वाढवून महिलेसोबत शारीरिक जवळीक साधली. पुढे त्याने तिचे वेळोवेळी लैंगिक शोषण केले व तिच्या बँक खात्यातून एकूण सहा लाख रुपयेही काढून घेतले. दरम्यान, तरुणीने आणखी रक्कम देण्यास नकार दिला असता, आरोपीने तिचे नग्न छायाचित्रे सोशल मीडियावर पसरविण्याची धमकी दिली. काही दिवसांनी त्याने तिच्या भावाला व कार्यालयातील सहकाऱ्याला काही छायाचित्रे पाठविली. त्यामुळे महिलेने २५ सप्टेंबर २०२० रोजी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
-----------------------
योजना आखून फसवले
आरोपी आधीच विवाहित होता. त्याचा पीडित महिलेसोबत लग्न करण्याचा उद्देश नव्हता. त्याने केवळ लैंगिक संबंध व पैशांकरिता पीडितेसोबत संपर्क वाढवला. त्याकरिता योजना तयार केली. आरोपी डॉक्टर नाही. त्याने पीडितेला फसवण्यासाठी वेबसाईटवर खोटी माहिती अपलोड केली. यासह विविध ठोस पुरावे लक्षात घेता आरोपीला जामीन दिला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने निर्णयात नोंदवले.