रेड झोन वसाहतीतील गर्भवतींना नागपुरातील ‘डागा’त प्रसूतीसाठी नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 10:16 PM2020-04-26T22:16:56+5:302020-04-26T22:18:47+5:30
‘रेड झोन’मधील गर्भवतीसाठी डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयातील डॉक्टर प्रसूतीसाठी नकार देत आहेत. रुग्णांना मेयो, मेडिकलमध्ये पाठविले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपाच्या सतरंजीपुरा व गांधीबाग झोनमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे हे दोन्ही झोन ‘रेड झोन’मध्ये टाकण्यात आले आहेत. या झोनमधील वसाहतीतील गर्भवतीसाठी डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयातील डॉक्टर प्रसूतीसाठी नकार देत आहेत. रुग्णांना मेयो, मेडिकलमध्ये पाठविले जात आहे. धक्कादायक म्हणजे, या दोन्ही रुग्णालयात ‘रेड झोन’विषयी माहिती नाही. डागा रुग्णालयाने हा परस्पर निर्णय घेतल्याने गर्भवतींच्या अडचणी वाढल्या आहेत. नागपुरात कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. शनिवारी एकाच दिवशी १९ रुग्णांची नोंद झाल्याने आरोग्य यंत्रणेच्या जबाबदारीत वाढ झाली आहे. यात गर्भवती मातेची प्रसूती हा एक चिंतेचा विषय ठरला आहे. सध्या तरी मेयो, मेडिकलमध्ये पॉझिटिव्ह गर्भवतींसाठी स्वतंत्र व्यवस्था नाही. मात्र प्रसूतीला वेळ असलेल्यांचे नमुने तपासले जात आहेत आणि ज्या वेळेवर प्रसूतीसाठी येत आहेत त्यांचे नमुने प्रसूतीनंतर तपासले जात आहेत.
सध्या तरी या रुग्णांमध्ये कुणी पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली नाही. भविष्यात अशा रुग्णांसाठी या दोन्ही रुग्णालयात स्वतंत्र ‘लेबर रुम’ व शस्त्रक्रिया कक्ष सुरू केले जाणार आहेत. परंतु डागा रुग्णालयाने रेड झोनमध्ये आलेल्या मनपाच्या सतरंजीपुरा व गांधीबाग झोनमधील गर्भवतींना प्रसूतीसाठी चक्क नकार देत असल्याने याचे पडसाद उमटू लागले आहे. सुरुवातीपासून डागा रुग्णालयातून उपचार घेणाऱ्या गर्भवती अडचणीत आल्या आहेत. विशेष म्हणजे, हे सर्व तोंडी सांगितले जात असून लिखित स्वरूपात लिहून द्यायला येथील डॉक्टर तयार नाहीत. डॉक्टरच कोरोनाला भीत असतील तर गर्भवतींनी काय करावे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मेयोमध्ये तूर्तास तरी सोय नाही
मेयोच्या स्त्रीरोग व प्रसूतीरोग विभागाचे प्रमुख डॉ. उईके म्हणाले, सध्या तरी मेयोमध्ये पॉझिटिव्ह गर्भवती महिलेच्या प्रसूतीसाठी सोय नाही. परंतु मेयोच्या कोविड हॉस्पिटलमध्ये अशी सोय राहणार आहे. येथे येणाऱ्या गभर्वतींचे नमुने घेऊन तपासणी सुरू केली आहे. परंतु ज्या वेळेवर प्रसूती येतात त्यांची प्रसूतीनंतरच नमुने घेतले जात आहे.
- कोविड हॉस्पिटलमध्ये असणार सोय
मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे म्हणाले, मेडिकलच्या कोविड हॉस्पिटल रविवारपासून रुग्णसेवेत सुरू झाले. या हॉस्पिटलमध्ये पॉझिटिव्ह गर्भवतींच्या प्रसूतीची सोय केली जात आहे.
पॉझिटिव्ह रुग्णाने डागा बंद पडेल
रेड झोनमधील वसाहतीतील गर्भवतींना आम्ही मेयो, मेडिकलमध्ये जाण्यास सांगत आहो. कारण एक जरी पॉझिटिव्ह रुग्णाची येथे प्रसूती झाल्यास रुग्णालय बंद पडण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मेयो, मेडिकलवर या रुग्णांचा भार पडेल, म्हणून हा आपल्यास्तरावर निर्णय घेतला आहे. डागामध्ये रोज २५ वर प्रसूती होतात.
- डॉ. सीमा पारवे, वैद्यकीय अधीक्षक, डागा रुग्णालय