भाईचंद रायसोनी सोसायटीच्या संचालकांविरुद्धचे गुन्हे रद्द करण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:12 AM2021-02-18T04:12:28+5:302021-02-18T04:12:28+5:30
नागपूर : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमधील हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यात आरोपी असलेल्या १८ संचालकांविरुद्धचे दोन गुन्हे रद्द ...
नागपूर : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमधील हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यात आरोपी असलेल्या १८ संचालकांविरुद्धचे दोन गुन्हे रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला व त्यांचे यासंदर्भातील अर्ज फेटाळून लावले. तसेच, संबंधित गुन्ह्यांचे खटले नियमित सुनावणी घेऊन येत्या १५ जूनपर्यंत निकाली काढण्याचे निर्देश विशेष सत्र न्यायालयाला दिले. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
आरोपी संचालकांमध्ये अंजली गोविंद संत (३०), संजय रमेश तायडे (३५), मयुरी मनोहर शेगोकर (२६), प्रमोदकुमार भाईचंद रायसोनी (५५), दिलीप कांतीलाल चोरडिया (५१), मोतीलाल ओंकार जिरी (४५), प्रमिला मोतीलाल जिरी (३८, सूरजमल बाबुमल जैन (५१), दादा रामचंद्र पाटील (५८), राजाराम काशीनाथ कोळी (४८), भगवान हिरामन वाघ (६४), डॉ. हितेंद्र यशवंत महाजन (५०), इंद्रकुमार आत्माराम लालवानी (४८), शेख रमजान शेख अब्दुल नबी (५२), ललिता राजू सोनवाने (४५), भागवत संपत माली (६१), सुखलाल शहादू माळी (४५) व यशवंत ओंकार जिरी यांचा समावेश आहे. त्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव व अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, त्यांना जोरदार दणका बसला. सरकारने न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, या सोसायटीच्या राज्यामध्ये तब्बल २२० शाखा असून संचालकांविरुद्ध राज्यभरात एकूण ७३ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. घोटाळ्याचा तपास राज्य सीआयडीकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. त्यांनी ७० गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्रे दाखल केली आहेत.