रक्त उपलब्ध असतानाही देण्यास नकार
By admin | Published: October 19, 2016 03:18 AM2016-10-19T03:18:12+5:302016-10-19T03:18:12+5:30
वैद्यकीय उपचारांदरम्यान किंवा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करीत असताना रक्त व रक्तघटकांची उपलब्धता महत्त्वाची मानली जाते.
मेडिकलच्या आदर्श रक्तपेढीतील प्रकार : सिकलसेलच्या रुग्णाच्या जीवावर बेतले
नागपूर : वैद्यकीय उपचारांदरम्यान किंवा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करीत असताना रक्त व रक्तघटकांची उपलब्धता महत्त्वाची मानली जाते. परंतु आदर्श रक्तपेढी म्हणून मान मिळविलेल्या मेडिकलच्या रक्तपेढीत अजब कारभार सुरू आहे. रक्त उपलब्ध असताना रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून रक्त आणावे लागत आहे. विशेष म्हणजे, खासगी रक्तपेढीतून रक्ताची जमवाजमव करताना मोठा वेळ जात असल्याने रुग्णाच्या जीवावर बेतत आहे. रविवारी अशाच एका प्रसंगाला सिकलसेलच्या रुग्णाला सामोरे जावे लागले. यात त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिकलसेलग्रस्त २४ वर्षीय युवकाला शनिवारी मेडिकलच्या वॉर्ड क्र. ९ मध्ये भरती करण्यात आले. रविवारी त्याची प्रकृती खालवल्याने सकाळी ११ वाजता तेथील निवासी डॉक्टराने रक्त आणण्याची सूचना रुग्णाच्या नातेवाईकांकडे केली. नियमानुसार संबंधित डॉक्टराने मेडिकलच्या रक्तपेढीला तसे पत्र देणे आवश्यक होते. परंतु पत्र न देताच रुग्णाचे केसपेपर देऊन रक्तपेढीत पाठविले. रक्तपेढीतील अधिकाऱ्याने केसपेपरवर कुठलीही नोंद न टाकता ‘ए पॉझिटीव्ह’ रक्त गट नसल्याचे सांगून नातेवाईकाला परत पाठविले. याची माहिती नातेवाईकांनी संबंधित निवासी डॉक्टराला दिली. त्यांनी बाहेरुन रक्त आणण्यास सांगितले. त्याच डॉक्टराने रुग्णाच्या रक्ताचा नमुनाही काढून दिला. खासगी रक्तपेढीतून रक्ताची जमावाजमव करण्यास दुपारचे ४ वाजले.
यावेळी डॉक्टर उपस्थित नव्हते. सायंकाळी ६ वाजता डॉक्टर आल्यानंतर त्यांनी रक्त चढवले. तब्बल सात तासानंतर रुग्णांला रक्त मिळाले. या दरम्यान रुग्णाची प्रकृती अधिक खालवली. सोमवारी पहाटे त्या युवकाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूला रक्त उशिरा मिळाल्याचे कारण पुढे केले जात आहे. परंतु या संदर्भात संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांनी कुठलीही तक्रार केली नाही. यामुळे प्रकरणाची चौकशी झाली नसल्याचे समजते.(प्रतिनिधी)
‘त्या’दिवशी १९ रक्तपिशव्या उपलब्ध होत्या
‘लोकमत’ने या संदर्भात चौकशी केली असता मेडिकलच्या रक्तपेढीत त्या दिवशी, रविवारी ‘ए पॉझिटीव्ह’ रक्तगटाच्या १९ रक्तपिशव्या उपलब्ध होत्या. रजिस्टरवर तशी नोंद आहे. असे असताना रक्तपेढीच्या अधिकाऱ्याने संबंधित रक्तगटाचे रक्त नसल्याचे सांगण्यामागे नेमका हेतू काय, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असेच प्रकार इतरही रुग्णांसोबत होत असल्याची माहिती आहे. रुग्णाच्या केसपेपरवर खासगी रक्तपेढीचे स्टीकर चिटकविले आहे.