नागपूरकर वाहतूक नियमांच्या बाबतीत ‘बेपर्वा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 09:32 PM2017-11-15T21:32:36+5:302017-11-15T21:36:17+5:30
आॅनलाईन लोकमत
नागपूर : नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. परंतु त्याचे पालन करण्यासाठी नागरिकांकडूनच पुढाकार घेण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. २०१७ मधील पहिल्या ९ महिन्यांतच ‘हेल्मेट’ न घालणाऱ्या ४० हजार नागरिकांना कारवाईला सामोरे जावे लागले तर मद्यपान करून चालविणारे १८ हजाराहून अधिक वाहनचालक सापडले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाकडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१७ ते ३० सप्टेंबर २०१७ या कालावधीत नागपूर शहरात ‘ड्रंकन ड्रायव्हिंग’ची किती प्रकरणे झाली, अतिवेग, सिग्नल तोडणे, मोबाईलवर बोलताना वाहन चालविणे इत्यादीसंदर्भात किती जणांवर कारवाई झाली यासंदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार या वर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत ‘हेल्मेट’ न घालता दुचाकी चालविणाऱ्या ४० हजार २ नागरिकांवर कारवाई करण्यात आली व त्यांच्याकडून १ कोटी ३९ लाख ५० हजार ६२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सरासरी काढली तर दर दिवशी सुमारे १४५ नागरिकांवर ‘हेल्मेट’ न घातल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.
याशिवाय अतिवेगाने वाहने चालविणाºया ११३२, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाºया ४४९१, ‘सिटबेल्ट’ न लावणाºया ७४७७ तर ‘ट्रीपलसीट’ दुचाकी चालविणाऱ्या ५९६६ नागरिकांवर कारवाई करण्यात आली.
‘ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह’च्या कारवाईत वाढ
दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांच्या अपघाताचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर वचक रहावा यासाठी नागपूर पोलिसांतर्फे ‘ड्रंकन ड्रायव्हिंग’च्या कारवाईचा वेग वाढविण्यात आला आहे. २०१७ मध्ये पहिल्या ९ महिन्यांतच १८८९० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मागील वर्षभरात कारवाईचा आकडा २७९७१ इतका होता.