नागपुरात ‘प्रादेशिक संदर्भ मानक’ प्रयोगशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 10:19 PM2018-02-01T22:19:58+5:302018-02-01T22:29:05+5:30
केंद्रीय अर्थसंकल्पात उपराजधानीच्या वाट्याला फारशा गोष्टी आल्या नसल्या तरी केंद्रीय पातळीवर एक संस्था येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत नागपुरात प्रादेशिक संदर्भ मानक प्रयोगशाळेची स्थापना होणार आहे. यासंदर्भात केंद्र शासनाने तरतूददेखील केली आहे. राज्यातील ही पहिलीच प्रादेशिक प्रयोगशाळा ठरणार आहे हे विशेष.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय अर्थसंकल्पात उपराजधानीच्या वाट्याला फारशा गोष्टी आल्या नसल्या तरी केंद्रीय पातळीवर एक संस्था येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत नागपुरात प्रादेशिक संदर्भ मानक प्रयोगशाळेची स्थापना होणार आहे. यासंदर्भात केंद्र शासनाने तरतूददेखील केली आहे. राज्यातील ही पहिलीच प्रादेशिक प्रयोगशाळा ठरणार आहे हे विशेष.
देशभरात अहमदाबाद, बंगळुरू, भुवनेश्वर, फरीदाबाद, गुवाहाटी येथे केंद्रीय पातळीवरील प्रादेशिक संदर्भ मानक प्रयोगशाळा कार्यरत आहेत. या प्रयोगशाळांमध्ये केंद्रीय व राज्य शासनाच्या संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि ‘लीगल मेट्रॉलॉजी’च्या क्षेत्रातील खासगी उद्योगांना अंशांकन, सत्यापन, परीक्षण सेवा प्रदान करण्यात येतात. २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात ‘लीगल मेट्रॉलॉजी’ला बळ देण्यासाठी नागपूर व वाराणसी येथे प्रादेशिक संदर्भ मानक प्रयोगशाळा उभारण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत एकूण ४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असली तरी नागपूरच्या वाट्याला यातील नेमका किती निधी येईल, हे स्पष्ट झालेले नाही.
मिहान प्रकल्पामुळे देशातील नामांकित आणि आंतरराष्ट्रीय स्तराच्या कंपन्या नागपुरात येण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे या प्रयोगशाळेची उपयुक्तता वाढणार आहे हे निश्चित.
दुय्यम मानक प्रयोगशाळा अगोदरपासूनच अस्तित्वात
राज्य शासनाच्या अखत्यारितील वैधमापनशास्त्र विभागाची दुय्यम मानक प्रयोगशाळा सिव्हिल लाईन्स येथे आहे. परंतु अत्याधुनिक उपकरणे नसल्यामुळे या प्रयोगशाळेचे महत्त्व कमी झाले आहे. प्रादेशिक संदर्भ मानक प्रयोगशाळेमुळे या प्रयोगशाळेलादेखील चालना मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.