नागपूर ग्रामीण रजिस्ट्रीची नोंदणी शहर उपनिबंधक कार्यालयात करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:08 AM2021-01-25T04:08:59+5:302021-01-25T04:08:59+5:30
नागपूर : नागपूर ग्रामीणचा परिसर मोठा असून तेथील घरे, फ्लॅट आणि प्लॉटची नोंदणी रजिस्ट्री कार्यालयात करण्यासाठी नागपुरात केवळ सक्करदरा ...
नागपूर : नागपूर ग्रामीणचा परिसर मोठा असून तेथील घरे, फ्लॅट आणि प्लॉटची नोंदणी रजिस्ट्री कार्यालयात करण्यासाठी नागपुरात केवळ सक्करदरा आणि सदर अशी दोनच कार्यालये आहेत. राज्य शासनाच्या मुद्रांक शुल्क कपात योजनेमुळे नागपूर ग्रामीण भागात रजिस्ट्रीची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता नागपूर ग्रामीणच्या रजिस्ट्री नागपूर शहरातील सातही कार्यालयात कराव्यात, अशा मागणीचे पत्र क्रेडाई नागपूर मेट्रोने नागपूर विभागाचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक प्रकाश पाटील यांना दिले आहे.
क्रेडाई नागपूर मेट्रोचे सचिव गौरव अगरवाला म्हणाले, नागपूर शहर आणि सभोवताल भागाचा विकास वेगाने होत आहे. बहुतांश नवीन प्रकल्प मनपा हद्दीच्या सभोवताल मेट्रो रिजनमध्ये होत आहेत. त्यामुळे या भागातील घरे, फ्लॅट आणि प्लॉटच्या रजिस्ट्री ग्रामीण उपनिबंधक कार्यालय ७ आणि १० मध्ये होतात. या रजिस्ट्रीसाठी केवळ दोनच कार्यालये असून कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी आहे. तसेच ही कार्यालये आठवड्यात दोन दिवस बंद असतात. रजिस्ट्रीसाठी जास्त वेळ लागत असल्याने मोठ्या प्रमाणात रजिस्ट्री प्रलंबित आहेत आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याशिवाय सर्व्हरची गती कमी असल्याने सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. त्यामुळे एका रजिस्ट्रीच्या कागदपत्रांच्या नोंदणीसाठी पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस लागत आहेत. नागपूर शहरासाठी सात आणि ग्रामीणसाठी दोन कार्यालये असल्याने ग्रामीणच्या रजिस्ट्री शहरी कार्यालयातही कराव्यात. त्यामुळे कामाचा ताण कमी होऊन सर्व रजिस्ट्री वेळेत होतील. अशा संदर्भातील निर्णय पुणे येथे घेण्यात आला आहे. त्यामुळे नागपूर विभागाने ग्रामीणच्या रजिस्ट्री शहरी उपनिबंधक कार्यालयात कराव्यात आणि ग्राहकांना होणाऱ्या मानसिक त्रासापासून दिलासा द्यावा, असे अगरवाला यांनी सांगितले.