२४ एप्रिलला रजिस्टर्ड मॅरेज; साडेतीन महिन्यांतच सनाचा ‘घात’, तपासातून धक्कादायक माहिती समोर
By नरेश डोंगरे | Published: August 12, 2023 10:32 PM2023-08-12T22:32:29+5:302023-08-12T22:32:53+5:30
Sana Khan Murder: जबलपूरमध्ये हत्या झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकारी सना उर्फ हिना काैसर खान यांचे अवघ्या साडेतीन महिन्यांपूर्वीच आरोपी अमित रज्जन साहूसोबत रजिस्टर्ड मॅरेज झाले होते.
- नरेश डोंगरे
नागपूर - जबलपूरमध्ये हत्या झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकारी सना उर्फ हिना काैसर खान यांचे अवघ्या साडेतीन महिन्यांपूर्वीच आरोपी अमित रज्जन साहूसोबत रजिस्टर्ड मॅरेज झाले होते. तर, लग्नाच्या दोन महिन्यांतच सनाने आरोपीला 'नव्या पाहुण्याची' गोड बातमी दिली आणि येथूनच आरोपीसोबत सना उर्फ हिना काैसर खान हिचा वाद तीव्र झाला, अशी धक्कादायक माहिती सनाच्या निकटस्थ गोटातून पुढे आली आहे.
सना आरोपी अमित साहूच्या संपर्कात कशी आली, त्याबाबत वेगवेगळ्या चर्चा आहे. त्याच्याशी घनिष्ट संबंध निर्माण झाल्यानंतर सनाच्या जबलपूर वाऱ्या आणि आरोपी साहूच्या नागपूर वाऱ्या वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, जबलपूरला सना आणि अमितने दि. २४ एप्रिल २०२३ला रजिस्टर्ड मॅरेज केले. शेरसिंह मीना नामक अधिकाऱ्याने त्यांना विवाह केल्याचे प्रमाणपत्र दिले. यावर अमितचे जबलपुरातील दोन, तर सनाचा नागपुरातील एक निकटस्थ उपस्थित होता. साक्षीदार म्हणून या तिघांनी तेथे सह्या केल्या.
दरम्यान, लग्न झाल्यानंतर काही दिवस माधुर्यात गेल्यानंतर दोन महिन्यांनी सनाने आरोपी अमितला नव्या पाहुण्याच्या आगमनाची गुड न्यूज दिली आणि तेथूनच आरोपीसोबत सनाचे खटके उडू लागल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर, आरोपी सनासोबत दोन महिन्यांपूर्वी नागपुरात आला. अमरावती मार्गावरील एका खासगी रुग्णालयात सनाला भरती करून गर्भपात करण्यात आल्याचेही सांगितले जाते. त्यानंतर सनाने गांधीबागमधील एका डॉक्टरकडूनही उपचार घेतले.
२ ऑगस्टच्या सकाळपासून बेपत्ता झालेल्या सनाची हत्या करून तिचा मृतदेह हिरन नदीत फेकल्याची कबुली आरोपी अमित साहूने दिली आहे. नोंदणीकृत विवाह केल्याच्या अवघ्या साडेतीन महिन्यांतच सनाची हत्या झाल्याने संबंधित वर्तुळात खळबळ उडाली आहे. राजकीय वर्तुळात वावरताना सनाचे अनेकांशी चांगले आणि मैत्रिपूर्ण संबंध निर्माण झाले होते. तिची अशाप्रकारे हत्या झाल्याचे कळाल्याने सनाच्या निकटस्थ असलेल्या अनेकांना जबर धक्का बसला आहे.
प्रमाणपत्रावर वयात फरक
सनाची हत्या आरोपीने नेमकी कोणत्या कारणामुळे केली ते अजून उघड झाले नाही. अनेकजण याबाबत तर्क लावत असले तरी हत्येचे कारण वेगळेच असल्याचा निकटस्थ मंडळींचा अंदाज आहे. लग्नाच्या प्रमाणपत्रावर आरोपीचे वय ३५, तर सनाचे वय ३८ दिसून येते.
पहिले लग्नही अल्पकाळच टिकले
सना उर्फ हिनाच्या निकटस्थ असलेल्यांच्या माहितीनुसार, ती २००८-०९ ला हिस्लॉपमध्ये शिकत असताना ईमरान शेख नामक तरुण तिला बाईकवर आणून सोडायचा. दोघांचेही पारिवारिक संबंध असल्याने २००९ मध्ये सनाचा विवाह ईमरानसोबत झाला. त्यांना एक मुलगाही झाला. सना काहीशी मुक्त आणि पुरोगामी विचाराची होती. त्यामुळे लग्नाच्या दोन वर्षानंतर त्यांच्यात खटके उडायला लागले. त्यानंतर सना वेगळी झाली. सनाचे जाफरनगर परिसरात मोठे निवासस्थान असून त्यांच्याकडे अनेक भाडेकरू आहेत. 'सामाजिक वर्तुळात' वावरतानाच ती २०१४-१५ ला राजकारणात आली. नंतर भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चात तिने काम केले. त्यानंतर अल्पसंख्यांक सेलची महामंत्री म्हणून सना सक्रिय होती.