पाठ्यपुस्तकांसाठी १ लाख ५९ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 06:09 PM2020-05-08T18:09:26+5:302020-05-08T18:13:35+5:30
शासकीय, जिल्हा परिषद, नगर परिषद व खासगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पुस्तकांची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने बालभारतीकडे नोंदणी केली आहे. शिक्षण विभागाकडून इयत्ता १ ते ८ च्या १ लाख ५९ हजार ६८१ विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली असून, राज्यस्तरावरून पुरवठाधारकही मंजूर झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय, जिल्हा परिषद, नगर परिषद व खासगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पुस्तकांची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने बालभारतीकडे नोंदणी केली आहे. शिक्षण विभागाकडून इयत्ता १ ते ८ च्या १ लाख ५९ हजार ६८१ विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली असून, राज्यस्तरावरून पुरवठाधारकही मंजूर झाला आहे. त्यामुळे लॉकडाऊन उघडताच तालुकास्तरावर पुस्तकांचा पुरवठा होणार असून, विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके उपलब्ध होणार आहेत.
केंद्र शासनाच्या ‘समग्र शिक्षा’ अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्याचे धोरण आहे. त्यानुसार जि.प. च्या शाळांनी बालभारतीच्या वेबसाईटला भेट देऊन पटसंख्येनुसार ही नोंदणी करावयाची होती. नागपूर जिल्हा परिषद, नगर परिषद, शासकीय, खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्र्थ्यांची पटसंख्या मागविण्यात आली. तालुकास्तरावरून ऑनलाईन पद्धतीने वर्ष २०१८-१९ च्या युडायसनुसार वर्ग, विषय, विद्यार्थीनिहाय नोंदणी करण्यात आली. शाळा भरलेल्या ‘यूडीआयएसई’ डाटानुसार इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत ८९,३७० विद्यार्थी, सहावी ते आठवीपर्यंत ७०,३११ अशा एकूण १ लाख ५९ हजार ६८१ विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. जि.प. माध्यमिक शिक्षण विभाग नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनाही मोफत पुस्तके उपलब्ध करून देणार आहे. पुस्तके लवकरात लवकर मिळावीत, यासाठी जिल्हास्तरातून ब्लॉकस्तरावर ही पुस्तके रवाना होतील. तेथून ती शाळांनी प्राप्त करावयाची आहे. कुठलाही विद्यार्थी पुस्तकापासून वंचित राहणार नाही.
विशेष म्हणजे, राज्य स्तरावरून बालभारतीकडे पुस्तके तयार असल्याचे सांगण्यात येते. यासोबतच राज्य स्तरावरूनच पुरवठाधारकही मंजूर झाला आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे जीवनावश्यक वस्तूंची वाहतुक वगळता इतर सर्व वाहतुकींवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. लॉकडाऊन संपुष्टात येताच पुरवठाधाराकडून तालुकास्तरावर पुस्तके पोहचविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे जेव्हाही शाळा सुरू होईल, तेव्हा विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके उपलब्ध होतील, याचेही नियोजन जि.प.च्या शिक्षण विभागाने केले आहे.