गर्भपातासाठी १२०० कुमारी मातांची नोंदणी
By admin | Published: March 3, 2016 02:55 AM2016-03-03T02:55:30+5:302016-03-03T02:55:30+5:30
उपराजधानीच्या ‘एमटीपी’ केंद्रात (मेडिकल टर्मिनेशन आॅफ प्रेग्नंसी) गेल्या चार वर्षांमध्ये सुमारे १,२०० कुमारी मातांची नोंदणी झाल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे.
‘एमटीपी’ केंद्रातील चार वर्षांची आकडेवारी :
आरोग्य विभागाला रिक्त जागांचा आजार
नागपूर : उपराजधानीच्या ‘एमटीपी’ केंद्रात (मेडिकल टर्मिनेशन आॅफ प्रेग्नंसी) गेल्या चार वर्षांमध्ये सुमारे १,२०० कुमारी मातांची नोंदणी झाल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील नोंदींनुसार यापैकी सहा कुमारी मातांचा मृत्यू झाला.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी कुमारी मातांची नोंदणी, यादरम्यान झालेले मृत्यू, मनपाच्या आरोग्य विभागातील रिक्त पदे इत्यादींबाबत माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारणा केली होती. ५ डिसेंबर २०१३ पासून ‘एमटीपी’ केंद्रांची नोंदणी नागपूर महानगरपालिकेकडून केली जाते. माहितीच्या अधिकाराबाबत नागपूर महानगरपालिकेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार १ एप्रिल २०१२ ते ३१ जानेवारी २०१६ या कालावधीमध्ये गर्भपातासाठी १,१९७ कुमारी मातांनी नोंदणी केली. सर्वात जास्त ४७२ मातांची नोंदणी २०१३-१४ या कालावधीत झाली. या कालावधीदरम्यान सहा कुमारी मातांचा मृत्यू झाला. यातील एक कुमारी माता अल्पवयीन होती.
मनपाचा आरोग्य विभाग ‘पांगळा’
दरम्यान, मनपाच्या आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात कर्मचारी व अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याची बाबदेखील समोर आली आहे. एकूण २ हजार ५ पदांपैकी केवळ १,१७५ पदे भरण्यात आलेली आहेत. अद्यापही ८३० पदे रिक्त आहेत.
परिचारिकांची तर ७५ पैकी ४२ पदे रिक्त आहेत. वर्ग ३ (तांत्रिक)मधील तर अर्ध्याहून अधिक पदे रिक्त आहेत. या वर्गात ४४५ मान्यताप्राप्त पदांपैकी केवळ २११ भरण्यात आलेली आहेत. पहिल्या वर्गातील ७८ पैकी ३६ पदे रिक्त आहेत.(प्रतिनिधी)