नोंदणी व मुद्रांक अधिकारी-कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:08 AM2021-09-21T04:08:47+5:302021-09-21T04:08:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नोंदणी व मुद्रांक विभागातील अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेने सर्व संवर्गातील रखडलेल्या पदोन्नती तातडीने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नोंदणी व मुद्रांक विभागातील अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेने सर्व संवर्गातील रखडलेल्या पदोन्नती तातडीने करण्याच्या प्रमुख मागणीसाठी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे दस्तनोंदणीची कामे होणार नाही, परिणामी शासनाच्या महसुलावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
पदोन्नतीच्या मागणीसोबतच एकूण २१ मागण्यांचे एक निवेदनही शासनाला सादर करण्यात आले आहे. यात पदोन्नतीची कार्यवाही पूर्ण झाल्याशिवाय नवीन सेवा प्रवेश लागू करण्यात येऊ नये, सर्व रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्या, कोविडमुळे मृत झालेल्या अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना तातडीने ५० लाखाची आर्थिक मदत करावी, कुटुंबातील एका व्यक्तीला अनुकंपा तत्त्वावर विभागात नोकरीत सामावून घ्यावे, खात्याची विभागीय परीक्षा प्रत्येक वर्षी घेण्यात यावी, विभागीय चौकशीची कार्यवाही विहित मुदतीत पार पाडावी, आदी मागण्यांचा यात समावेश आहे.