प्राणी, पक्ष्यांचा व्यवसाय करणाऱ्यांना नाेंदणी बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 10:56 AM2021-07-09T10:56:45+5:302021-07-09T10:58:24+5:30
Nagpur News पाळीव प्राणी आणि पक्ष्यांचे दुकान चालविणाऱ्यांना आता नाेंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. एवढेच नाही तर घरीही एखादा प्राणी किंवा पक्षी पाळला असेल त्याचीही नाेंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
निशांत वानखेडे
नागपूर : पाळीव प्राणी आणि पक्ष्यांचे दुकान चालविणाऱ्यांना आता नाेंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. एवढेच नाही तर घरीही एखादा प्राणी किंवा पक्षी पाळला असेल त्याचीही नाेंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तशी नाेंदणी केली नसल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येत असून पशुकल्याण आयुक्त कार्यालयाद्वारे त्यासाठी शाेधमाेहिम सुरू करण्यात आली आहे.
पाळीव प्राणी व पक्ष्यांचा अवैध व्यापार राेखण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी कायदेशीर नाेंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा कायदा २०१८ मध्ये पारित करण्यात आला व ६० दिवसाच्या आत प्रत्येक जिल्ह्यात अशाप्रकारे पेट शाॅपची नाेंदणी अनिवार्य करण्यात आली हाेती. मात्र जनजागृती अभावी आणि पुढे काेराेनामुळे ही प्रक्रिया रखडली. नाेंदणी आणि कारवाईचे अधिकार पशुकल्याण आयुक्त कार्यालयाला देण्यात आले आहे.
नागपूरच्या पशुकल्याण उपायुक्त मंजुषा पुंडलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार नुकतीच शहरातील पेट शाॅप चालकांची बैठक बाेलावून त्यांना कायद्यातील तरतुदींबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यांना नाेंदणी करण्याची अनिवार्यता समजावून सांगितली. त्यामुळे अवैध दुकाने चालविणाऱ्यांना व ब्रिडर्सना आळा बसणार आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या चालकांची नाेंदणी झाल्यानंतर अवैध दुकाने चालविणाऱ्यांसाठी शाेधमाेहिम सुरू करून कारवाई करण्याचा इशारा उपायुक्तांनी दिला. यासाठी तयार करण्यात आलेल्या पशुकल्याण समितीवर जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग असून त्यांच्या आदेशानंतर नाेंदणी व कारवाई अभियान चालविण्यात येणार असल्याचे मंजुषा पुंडलिक यांनी स्पष्ट केले.
पावणेदाेनशे अधिकृत विक्रेता
मंजुषा पुंडलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर शहरात जवळपास १७५ पेट शाॅप चालक आणि विदेशी श्वानांची ब्रिडिंग करणाऱ्या ५० च्या आसपास व्यावसायिकांची संख्या आहे. याशिवाय अनेक अनधिकृत दुकानदार आहेत आणि घरातून बेकायदेशीरपणे पाळीव प्राणी, पक्ष्यांची विक्री करणारेही भरपूर आहेत. ज्यांनी अधिकृतपणे नाेंदणी केली, त्यांना तात्पुरती परवानगी देऊन त्यांची माहिती राज्य पशुकल्याण मंडळाकडे पाठविली जाईल. त्यानंतर दुकानदारांच्या दुकानांची तपासणी करून व्यवसाय करण्याचे लायसन्स देण्यात येईल. ज्यांनी नाेंद केली नाही त्यांना शाेधून कारवाई करण्यात येईल.
या नाेंदणी प्रक्रियेमुळे श्वान व इतर पाळीव प्राणी, पक्ष्यांच्या बेकायदेशीर विक्रीला आणि ब्रिडिंगला आळा बसेल. शिवाय प्राणी, पक्ष्यांवर हाेणारे अत्याचार थांबविता येईल. आतापर्यंत अवैध विक्री व ब्रिडिंगचा प्रकार दृष्टीस येत हाेता पण आता कायदेशीर प्रक्रिया पाळावी लागणार असल्याने कारवाई करणे साेपे हाेईल.
- मंजुषा पुंडलिक, पशुकल्याण उपायुक्त, जिल्हा पशुकल्याण मंडळ