सहा महिन्यानंतर सुरू झाली नोंदणी खिडकी
By Admin | Published: August 18, 2015 03:22 AM2015-08-18T03:22:02+5:302015-08-18T03:22:02+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागात येणाऱ्या रुग्णांना नवीन नोंदणी कार्ड
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागात येणाऱ्या रुग्णांना नवीन नोंदणी कार्ड काढण्यासाठी रुग्णालयाच्या मुख्य इमारतीत जावे लागत असे. विभागापासून हे अंतर बरेच लांब असल्याने नेत्र रोग रुग्णांना याचा त्रास व्हायचा. ‘लोकमत’ने या संदर्भातील वृत्त प्रकाशित करताच मेडिकल प्रशासनाने याची दखल घेतली. तब्बल सहा महिन्यानंतर नुकतीच विभागातच नोंदणी खिडकी सुरू झाली.
मेडिकलचे नेत्ररोग विभागात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, या विभागाला पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेतून ५१ लाख रुपयांची यंत्रसामुग्री, नवे किरकोळ शस्त्रक्रियागृह आणि अद्यावत ओपीडी मिळाल्याने याचा फायदा रुग्णांना होत आहे. पूर्वी नेत्ररोग विभागातच रुग्णांची नोंदणी खिडकी ‘हेल्थ इन्फॉर्मेशन मॅनेजमेन्ट सिस्टीम’ (एचआयएमएस) सुरू होती. परंतु सहा महिन्यांपूर्वी केबल तुटल्याने ही सिस्टीम बंद पडली. रुग्णांना मेडिकलच्या मुख्य इमारतीत नवीन कार्ड काढण्यासाठी जावे लागत होते. विभागातच ही सिस्टीम सुरू करण्यासाठी ‘एचआयएमएस’ला पत्र दिले, परंतु त्यांनी निधी नसल्याचे कारण सांगून हात वर केले. ‘लोकमत’ने याला वाचा फोडताच आठवड्याभरात नोंदणी खिडकी सुरू झाली. रुग्णांची फरफट काही प्रमाणात कमी झाल्याचे बोलले जात आहे.
गेल्या महिन्यात अभ्यागत मंडळाच्या बैठकीत एका सदस्याने नेत्र रोग विभागातच औषधालय, नवीन शस्त्रक्रिया कक्ष आणि दोन वॉर्डाचे बांधकाम करण्याची मागणी केली होती. असे झाल्यास रुग्णांना याचा फायदा होण्याची आणि रुग्णालयाच्या मुख्य इमारतीतील गर्दीही कमी होण्याची शक्यता वर्तविली होती. त्यावेळी उपस्थित केंद्रीय वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी हे गंभीरतेने घेतले होते. (प्रतिनिधी)