उद्योगांना ऑक्सिजनचा पुरवठा नियमित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:07 AM2021-05-31T04:07:09+5:302021-05-31T04:07:09+5:30
नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे स्थानिक, राज्य व केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन ...
नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे स्थानिक, राज्य व केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी औद्योगिक क्षेत्राला ऑक्सिजन पुरवठा करण्यास केलेला मनाई आदेश रद्द करावा आणि कंपन्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा आदेश जारी करावा, अशी उद्योजकांची मागणी आहे.
चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीचे (कॅमिट) अध्यक्ष दीपेन अग्रवाल म्हणाले, उद्योगांनी साथीच्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी ऑक्सिजन वापरणारे युनिट बंद करून प्रशासनास सहकार्य केले. पण सध्या रुग्णालयांकडून ऑक्सिजनची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे शासनाने आदेश रद्द करून किंवा त्यात शिथिलता आणून उद्योगांना ऑक्सिजनचा पूर्ववत पुरवठा करावा. शिवाय ज्या उद्योगात ऑक्सिजन तयार होते, अशा उद्योगांना ऑक्सिजन वापरण्याची परवानगी द्यावी. त्यामुळे उद्योगात उत्पादन वाढेल आणि अर्थव्यवस्थेला हातभार लागेल. तसेच स्थलांतरित कामगार पुन्हा कामावर परततील, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. अनेक उद्योगांमध्ये साठवण क्षमता नसल्याने ऑक्सिजननिर्मिती बंद करावी लागत आहे. उत्पादन बंद असल्याने उद्योगांना अडचण येत आहे. छत्तीसगड, राजस्थान या राज्यांनी उद्योगात ऑक्सिजननिर्मिती उपयोगात आणण्याचे आदेश दिले आहेत.
बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स इंडस्ट्रीज असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद कानडे म्हणाले, नागपुरात दहा रिफिलिंग, दोन हवेतून ऑक्सिजननिर्मिती करणारे आणि उद्योगात ऑक्सिजननिर्मितीचे ३० प्रकल्प आहे. हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या एका प्रकल्पाची क्षमता ९० मेट्रिक टन आणि दुसऱ्याची २१ मेट्रिक टन आहे. नागपुरात दरदिवशी १८,५०० जंबो सिलिंडर रिफिलिंगची क्षमता आहे. त्यापैकी १५ हजार सिलिंडर उपलब्ध आहेत. सर्वच जणांनी १४ हजार सिलिंडर शासनाकडे जमा केले आहेत. हे सिलिंडर रिफिलिंग करून वैद्यकीय क्षेत्रात उपयोगात आणले जातात. रिक्त जंबो सिलिंडरचे वजन ५० किलो तर त्यात ७ ते ८ किलो ऑक्सिजन असतो. आता वैद्यकीय क्षेत्राकडून ऑक्सिजनची मागणी कमी झाल्याने असोसिएशनने शासनाकडे २० टक्के ऑक्सिजनचा वापर औद्योगिक क्षेत्रासाठी करण्याची परवानगी मागितली आहे. औद्योगिक क्षेत्राला हळूहळू पुरवठा वाढल्यास शासन टक्केवारी वाढविण्याची अपेक्षा आहे. यावर सोमवारी वा मंगळवारी निर्णय होण्याची अपेक्षा आहे. नागपुरात नव्याने २५ ते ३० ऑक्सिजनचे प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्यामुळे ऑक्सिजनची मुबलकता वाढणार आहे. कदाचित कोरोनाची तिसरी लाट आल्यास सर्व ऑक्सिजनचा पुरवठा वैद्यकीय क्षेत्राला करता येईल. त्यामुळे शासनाने उद्योजकांच्या मागणीवर तातडीने निर्णय घ्यावा.