दिवसा कारने रेकी अन् रात्री घरफोडी; तीन सराईत चोरटे असे अडकले जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 02:18 PM2023-01-27T14:18:34+5:302023-01-27T14:19:02+5:30
गुन्हेशाखेच्या पथकाची कारवाई
नागपूर : शहरातील दिवसभर विविध भागांत कारने फिरून रेकी करून रात्री घरफोडी करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला नागपूर पोलिसांच्या गुन्हेशाखेने गजाआड केले आहे. या टोळीतील तीन सदस्यांना अटक करण्यात आली असून, त्यांनी प्राथमिक चौकशीत दोन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. मात्र, आरोपी सराईत चोरटे असून, त्यांनी याहून जास्त चोऱ्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
१० डिसेंबर ते २४ डिसेंबरदरम्यान अजनी येथील माँ रेणुका विहार येथे राहणाऱ्या राजेंद्र उके (६३) यांच्याकडे चोरी झाली होती. चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, कॅनॉन कंपनीचा कॅमेरा, रोख ५० हजार रुपये चोरून नेले होते. गुन्हेशाखेकडून या प्रकरणात समांतर तपास सुरू होता. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही, तसेच इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सच्या माध्यमातून तीन आरोपी असल्याचा निष्कर्ष काढला. खबऱ्यांकडून मिळालेल्या टिपच्या आधारावर पथकाने सापळा रचला व अक्षय नागोराव दारोकार (२४, किनखेडा, सावनेर), राहुल संतोष नायडू (२८, किनखेडा, सावनेर) व फैजान समीरुल्ला खान (२६, दवलामेटी, वाडी) यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्यांनी अजनी व बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून २ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस उपायुक्त मुमक्का सुदर्शन, सहायक पोलिस आयुक्त रोशन पंडित, पोलिस निरीक्षक मयूर चौरसिया, बलराम झाडोकार, राजेश देशमुख, प्रवीण रोडे, रवी अहीर, प्रशांत गभणे, नरेंद्र ठाकूर, कुणाल मसराम, नीलेश श्रीपात्रे, सुधीर पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
चोरीच्या पैशाने नशा
तीनही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, त्यांना नशा करण्याचे व्यसन आहे. चोरीच्या पैशांतून ते नशा करायचे. दिवसभर कारने फिरून बंद घरांची रेकी करायचे व रात्री घरफोडी करायचे.