घरकामगार बोर्डाची पूर्ववत स्थापना करा : विदर्भ मोलकरीण संघटनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 11:29 PM2019-08-14T23:29:30+5:302019-08-14T23:32:15+5:30
घरकामगार बोर्डाची पूर्ववत स्थापना करण्यात यावी, असंघटित क्षेत्रासाठी केंद्राप्रमाणे किमान वेतन विधेयक पारित करण्यात यावे, आदी मागण्यांसाठी विदर्भ मोलकरीण संघटनेतर्फे अप्पर कामगार आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरकामगार बोर्डाची पूर्ववत स्थापना करण्यात यावी, असंघटित क्षेत्रासाठी केंद्राप्रमाणे किमान वेतन विधेयक पारित करण्यात यावे, आदी मागण्यांसाठी विदर्भ मोलकरीण संघटनेतर्फे अप्पर कामगार आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आले. संघटनेच्या अध्यक्षा डॉ. रुपाताई कुळकर्णी व विलास भोंगाडे यांच्या नेतृत्वात हे शिष्टमंडळ अधिकाऱ्यांना भेटले.
डॉ. रुपाताई कुळकर्णी यांनी सांगितले, मोलकरीण व घरकामगार यांच्या अनेक वर्षांच्या लढ्यानंतर २००८ साली महाराष्ट्रात घरकामगार कायदा करण्यात आला व त्यानंतर २०११ साली घरकामगार कल्याणकारी बोर्डाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे ५५ ते ५९ वर्षे वयोगटातील घरकामगारांना १० हजार मानधन मुलांना विद्यावेतन सुरू झाले. मात्र २०१४ साली नवे सरकार सत्तेवर येताच घरकामगार बोर्ड बरखास्त करण्यात आले. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून या गरीब कामगारांना मिळणारा लाभ बंद झाला आहे. घरकामगारांची अवस्था लक्षात घेऊन घरकामगार बोर्डाची पुन्हा स्थापना करण्यात यावी, घरकामगारांना वृद्धापकाळ पेन्शन लागू करण्यात यावी, ६० वर्षांवरील कामगारांची बोर्डात नोंदणी करावी, सिटी बस व मेट्रोमध्ये पास देण्यात यावे, या कामगारांना पीएफ लागू व्हावा, मुलांना शिष्यवृत्ती लागू करावी, आदी मागण्यांचे निवेदन शासनाकडे पाठविण्यात आले. शिष्टमंडळात रजनी वंजारी, सुजाता भोंगाडे, सुरेखा डोंगरे, ममता पाल, शालू अखंड, लता धुर्वे, सरिता जुनघरे, कांता मडामे, मंजुळा मेश्राम, वैशाली शहाकार आदींचा सहभाग होता.