नागपुरात लिव्ह इन रिलेशनशिपनंतर लग्नास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 10:17 AM2018-06-18T10:17:21+5:302018-06-18T10:17:28+5:30
तीन वर्षे लिव्ह इन रिलेशनशिप ठेवल्यानंतर आता लग्नास नकार देणाऱ्या एका बँक अधिकाऱ्याविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तीन वर्षे लिव्ह इन रिलेशनशिप ठेवल्यानंतर आता लग्नास नकार देणाऱ्या एका बँक अधिकाऱ्याविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. प्रीतेश परतेकी (वय २४) असे आरोपीचे नाव आहे. तो बोरगावमधील एकतानगरात राहतो. तक्रारदार तरुणी (वय २४) उच्चशिक्षित असून, तिने कायद्याचेही (विधी) शिक्षण घेतले आहे.
तरुणी आणि आरोपी प्रीतेश या दोघांचे तीन वर्षांपूर्वी प्रेमसंबंध जुळले. घरच्यांना त्याची कुणकुण लागल्यानंतर दोघांनीही लग्न करणार असल्याचे घरच्यांना सांगितले. त्यामुळे घरच्यांनी त्यांच्या लग्नाला संमती दिली. त्यानंतर त्यांनी शरीरसंबंध प्रस्थापित करणे सुरू केले. दरम्यान, प्रीतेश बँकेतील नोकरीच्या निमित्ताने चेन्नईला गेला. तेथे तरुणीही गेली. हे दोघे एकाच सदनिकेत लिव्ह इनमध्ये राहू लागले. तेथे त्यांच्यात खटके उडायला लागले. प्रीतेश तिला मारहाण करून रुममध्ये बंद करायचा आणि ड्युटीवर निघून जायचा. २५ मे २०१५ ते १२ एप्रिल २०१८ या कालावधीत हे सर्व झाले. दरम्यान, प्रीतेशची नागपुरात बदली झाली. त्यामुळे हे दोघे येथे परतले. आता तरुणीने त्याच्यामागे लग्नासाठी तगादा लावला असता आरोपीने लग्नास स्पष्ट नकार दिला.
तरुणीसह घरच्यांनीही त्याची समजूत काढण्याचे बरेच प्रयत्न केले. मात्र, तो ऐकायला तयार नसल्याने अखेर तरुणीने त्याच्याविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांकडे शनिवारी तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक व्ही. आर. राठोड यांनी आरोपी प्रीतेशविरुद्ध बलात्कार, मारहाण करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.