आंतरराष्ट्रीय ठगबाज टोळीतील दोघांचा जामीन फेटाळला
By Admin | Published: January 26, 2017 02:40 AM2017-01-26T02:40:15+5:302017-01-26T02:40:15+5:30
अमेरिकेत नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांना कोट्यवधीने चुना लावणाऱ्या आंतरराष्ट्रीय ठकबाज टोळीतील दोघांचा जामीन
सत्र न्यायालय : नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक प्रकरण
नागपूर : अमेरिकेत नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांना कोट्यवधीने चुना लावणाऱ्या आंतरराष्ट्रीय ठकबाज टोळीतील दोघांचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.
इशाक ऊर्फ टिपू हुसैन काझी (५४) रा. मिरा रोड ठाणे आणि इम्रान ऊर्फ समीर इब्राहिम काझी (३५) रा. पांगलोली, जिल्हा रायगड, अशी जामीन अर्ज फेटाळलेल्या आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणात आतापर्यंत अमित बाबासो शिंदे रा. सातारा, अशोक अनिल पवार रा. वाळूंज बिड, चंद्रशेखर लालासाहेब शिंदे रा. वाळूंज, इशाक काझी, अर्शद मेहमूद अन्सारी रा. काशीपूर उत्तर प्रदेश आणि इम्रान काझी, अशा सहा जणांना अटक करण्यात आलेली आहे. आणखी तुकाराम पवार, प्रशांत आणि मायकल व सॅम नावाचे नायजेरियन व्यक्ती पोलिसांना पाहिजे आहेत. नागपुरात तूर्त या टोळीने अजनी जोशी वाडी येथील एलिशबा व्हिव्हियन डेमराईज आणि तिच्या भावाची १० लाख १३ हजार ७२९ रुपयांनी फसवणूक केलेली आहे. ही फसवणूक २ डिसेंबर २०१४ ते १८ मे २०१५ या दरम्यान झालेली आहे. एलिशबा डेमराईज हिच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी या टोळीविरुद्ध २४ मे २०१५ रोजी भादंविच्या ४१९, ४२०, ४६८, १२० (ब)आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६६ (सी), ६६ (डी) कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. प्रकरण असे की, या आंतरराष्ट्रीय ठगबाज टोळीतील सदस्यांनी एलिशबाच्या मोबाईल आणि इमेल आयडीवर संपर्क केला होता. एलिशबा हिला युनायटेड स्टेट आॅफ अमेरिकेतील स्क्लमबर्गर येथील आॅईल अँड गॅस कंपनीत अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टन्ट मॅनेजर आणि तिच्या भावाला मेकॅनिकल इंजिनियर म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले होते.
त्यांना युनायटेड स्टेट दूतावासातील थॉमस वजदा यांच्या नावाचा गैरवापर करून वेगवेगळे खोटे ई-मेल पाठवीत होते. व्हिसा वर्क परमीट, एअर तिकिट आदीसाठी लागणाऱ्या प्रकियेच्या नावावर त्यांना ८ बँकांचे खाते क्रमांक देऊन त्यात वेळोवेळी १० लाख १३ हजार ७२९ रुपये जमा करण्यास भाग पाडले होते. त्यांना नोकरी न देता चक्क त्यांची या टोळीने फसवणूक केली होती. (प्रतिनिधी)
शेकडो खातेधारकांचा टोळीत समावेश
या ठगबाज टोळीचा इशाक काझी हा सूत्रधार आहे. त्याने २०१३ ते २०१५ या काळात शेकडो खातेधारकांना कमिशन देण्याचे आमिष दाखवून आपल्या टोळीत सहभागी केले होते. त्यांचे पासबुक आणि एटीएम कार्ड इशाक आणि अरशद अन्सारी हे स्वत:जवळ ठेवून घेत होते. फसवलेल्या बेरोजगारांचा पैसा ही टोळी या खातेधारकांच्या खात्यात जमा करायला लावत होती.
सप्टेंबर २०१३ ते १९ जानेवारी २०१५ या काळात एकट्या इशाकने ७० ते ८० बँक खातेधारकांवर लक्ष ठेवून, त्यांनी काढून दिलेले ५० ते ६० कोटी रुपयांपेक्षा अधिक आपल्या ताब्यात घेतलेले आहेत.
इशाक हा १९ आॅगस्टपासून आणि इम्रान हा २६ आॅगस्टपासून अटकेत असून, ते सध्या कारागृहात आहेत. या दोघांनी जामीन अर्ज दाखल केला असता, प्रकरण गंभीर असल्याने त्यांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील पंकज तपासे यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक एस. एस. संखे हे तपास अधिकारी आहेत.