सामूहिक बलात्कार प्रकरणी जामीन फेटाळला
By admin | Published: June 13, 2016 03:17 AM2016-06-13T03:17:27+5:302016-06-13T03:17:27+5:30
सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी अतिरिक्त
नागपूर : सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांच्या न्यायालयाने मुख्य सूत्रधाराचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
शेख रिजवान शेख साबीर (२६), असे आरोपीचे नाव असून तो आॅटोचालक आहे आणि टिमकी लालपत्थर येथील रहिवासी आहे. पीडित मुलीला आपल्या आॅटोरिक्षातून नेताना रिजवान आणि त्याच्या साथीदारांनी सामूहिक बलात्कार केला, असा आरोप आहे.
सावत्र आईच्या छळाला कंटाळून ही दुर्दैवी मुलगी आपल्या वेगवेगळ्या नातेवाईकांकडे राहायची . तिचे नातेवाईक लग्न करून देणार असल्याने ती १९ जून २०११ रोजी पळून जाऊन नागपूर रेल्वेस्थानकावर गेली होती. २४ जून २०११ रोजी ती चहा घेण्याकरिता रेल्वेस्थानकाच्या बाहेर पडताच तिला रिजवानने गाठले होते. मदत करण्याचे आमिष दाखवून तो तिला आपल्या आॅटोरिक्षातून एका महिलेच्या घरी घेऊन गेला होता. माझ्या बहिणीची मुलगी असल्याचे तिला सांगितले होते. काही वेळानंतर त्याने पीडित मुलीला जबरदस्तीने आॅटोरिक्षात बसवून शहरातील विविध भागात नेले होते. तिला एका गोदामात नेऊन तिच्यावर एकट्याने बलात्कार केला होता. त्यानंतर त्याचे दोन मित्र त्याला भेटले होते. नंतर या तिघांनी तिला बसमध्ये नेऊन सामूहिक बलात्कार केला होता. कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही तिला देण्यात आली होती. त्यांनी तिला रेल्वेस्थानकावर पोहोचवून दिले होते.
वाहीद खान नावाच्या इसमाने पीडित मुलीला मदत करून पोलीस ठाण्यात नेले होते. सीताबर्डी पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून भादंविच्या ३६६ -ए, ३७६ (२)(जी) आणि ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करून रिजवान याला २६ फेब्रुवारी २०१६ रोजी अटक केली होती. अद्याप त्याचे साथीदार पोलिसांना गवसले नाहीत. दरम्यान आरोपी रिजवान याने केलेला जामीन अर्ज प्रकरण गंभीर असल्याने फेटाळण्यात आला. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील संदीप डोंगरे यांनी काम पाहिले. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक पां. भा. ठोंबरे आणि सहायक पोलीस निरीक्षक जी. पी. राऊत हे आहेत. (प्रतिनिधी)