१० जणांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By admin | Published: July 3, 2016 02:50 AM2016-07-03T02:50:07+5:302016-07-03T02:50:07+5:30
नऊ हजार कोटी रुपयांच्या अवैध डब्बा व्यापारप्रकरणी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पुष्पा गणेडीवाला यांच्या न्यायालयाने शनिवारी १० आरोपींचा
अवैध डब्बा व्यापार: रवी अग्रवाल, वीणा सारडा यांचा समावेश
नागपूर : नऊ हजार कोटी रुपयांच्या अवैध डब्बा व्यापारप्रकरणी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पुष्पा गणेडीवाला यांच्या न्यायालयाने शनिवारी १० आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
सचिन ठाकूरमल अग्रवाल (३६) रा. जीवनधारा अपार्टमेंट सतनामीनगर, विनय श्रीप्रकाश अग्रवाल रा. सूर्यनगर, अंकित ओमप्रकाश मालू रा. वाठोडा, रवी ओमप्रकाश अग्रवाल रा. हिवरीनगर, कन्हैया रामचंद्र थावरानी रा. गरोबा मैदान, वीणा घनश्याम सारडा रा. शिवाजीनगर, दिनेश चंदूलाल गोखलानी, दिनेश भवरलाल सारडा, उत्तम ऊर्फ गोपी द्वारकाप्रसाद मालू आणि जाकीर हुसैन शेख, अशी आरोपी व्यावसायिकांची नावे आहेत.
आरोपी हे शेअर ब्रोकर व्यवसायातील आहेत. हे आरोपी सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन अॅक्टच्या डीमॅट खात्यांतर्गत नोंदणी न झालेल्या ग्राहकांची ‘सौदा’ नावाच्या अवैध सॉफ्टवेअरमध्ये नोंद करीत होते. याच सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कमोडिटीज आणि शेअर्सच्या खरेदी-विक्रीचा नगदी स्वरूपात व्यवहार करीत होते. हा व्यवहार म्हणजेच डब्बा व्यापार होय. हे आरोपी पैशाच्या देवाण-घेवाणीचे सेटलमेंटही मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज क्लिअरिंगच्या प्रस्तावित नियमांनुसार न करता परस्पर करून मोठ्या प्रमाणावर मिळणाऱ्या महसुलापासून शासनाला वंचित ठेवत होते. या डब्बा व्यापारामुळे शासनाला कोट्यवधीच्या महसुलापासून वंचित व्हावे लागले आहे. आरोपींनी शासन, मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज आणि सेबीची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली आहे.
सरकारतर्फे १३ मे २०१६ रोजी सीताबर्डी, लकडगंज आणि तहसील पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवल्यानंतर आरोपींविरुद्ध तिन्ही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात यापूर्वी १३ जणांना अटक झालेली आहे. या १० आरोपींनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात वेगवेगळे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले होते. प्रकरण गंभीर असल्याने आणि तपासासाठी आरोपींची पोलीस कोठडी आवश्यक असल्याने न्यायालयाने आरोपींचे सर्व अर्ज फेटाळून लावले. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील राजेंद्र मेंढे यांनी काम पाहिले. सरकार पक्षाला सहाय्य म्हणून आरोपी वीणा सारडा प्रकरणात अॅड. अतुल पांडे, अॅड. आशिष किल्लेदार यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)