वाठोडा भागातील खुनात दोघांचा जामीन फेटाळला
By admin | Published: June 26, 2017 02:12 AM2017-06-26T02:12:47+5:302017-06-26T02:12:47+5:30
नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाठोडा भागात झालेल्या एका खुनात अतिरिक्त सत्र न्यायाधीश माधुरी देशपांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाठोडा भागात झालेल्या एका खुनात अतिरिक्त सत्र न्यायाधीश माधुरी देशपांडे यांच्या न्यायालयाने दोन आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावले.
सुगत ऊर्फ धम्मदीप दीपक बागडे (२२) रा. वाठोडा रिंगरोड आणि जितेंद्र ऊर्फ बुढ्डा रामदेव पासवान (१९) रा. खरबी, अशी आरोपींची नावे असून हरीश दयाराम बावणे (३५) रा. कामाक्षी ले-आऊट, श्रीराम सोसायटी, असे मृताचे नाव आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून १६ डिसेंबर २०१६ रोजी तीन बाल संघर्षग्रस्त बालकांसह आठ जणांनी सशस्त्र हल्ला करून हरीश बावणे याला गंभीररीत्या जखमी केले होते. दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला होता. खुनाची ही घटना मोहल्ल्यातील शेकडो लोकांनी पाहिली होती.
मृताच्या बहिणीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी भादंविच्या ३०२, १४३, १४४, १४७, १४९, शस्त्र कायद्याच्या ४/२५ आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करून सुगत बागडे, जितेंद्र पासवान, मोहम्मद असलम मोहम्मद समसूल अन्सारी (२२), सूरज भगवान गवळी (१८), रोहन सतीश रंगारी (१८) तिन्ही रा वाठोडा आणि तीन विधी संघर्षग्रस्त बालकांना अटक केली होती.
पाच आरोपींना न्यायालयीन कोठडीत मध्यवर्ती कारागृहात तर विधी संघर्षग्रस्त बालकांना बाल सुधारगृहाकडे रवाना करण्यात आले होते. न्यायालयात सरकारच्यावतीने जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी काम पाहिले.