चायना फटाक्यांना नकार, इको फे्रंडलीचे स्वागत
By Admin | Published: October 20, 2016 03:07 AM2016-10-20T03:07:41+5:302016-10-20T03:07:41+5:30
दिवाळीत फटाके ही अत्यावश्यक बाब आहे. या सणासाठी फटक्यांची दुकाने सजली आहेत.
कमी प्रदूषण व आवाज : लोकांचा प्रतिसाद
नागपूर : दिवाळीत फटाके ही अत्यावश्यक बाब आहे. या सणासाठी फटक्यांची दुकाने सजली आहेत. यावर्षी व्यापाऱ्यांना उत्तम व्यवसायाची अपेक्षा आहे. दरवर्षी फटाक्यांमध्ये नवीन पाहायला मिळते. पण यावर्षी फटाका निर्मात्यांनी आगळवेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी कमी प्रदूषण आणि आवाजाचे इको फ्रेंडली फटाके बाजारात विक्रीसाठी आणले आहेत.
रसायनाची कमी मात्रा आणि कागदापासून तयार केलेल्या फटाक्यांनी चायना फटाक्यांची जागा घेतली आहे. देशातील व्यापाऱ्यांनी चायना फटाक्यांवर टाकलेला बहिष्कार पाहता नागपुरातील विक्रेत्यांनीही विक्रीला नकार दिला आहे. सध्या नागपुरात शिवाकाशी येथील देशी आणि विशेषत: इको फ्रेंडली फटाक्यांची आवक होत आहे. त्याच्या किमतीत थोडीफार वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आकर्षक फटाक्यांची धूम
फटाक्यांच्या संगीतमय माळा, किटकॅट फुलझडी, प्लॅस्टिक बंदूक, सायरन फुलझडी, मल्टीकलर पेंटिंग, क्रिसमस अनार, वेलकम अनार आदींची जास्त मागणी आहे. याशिवाय ४-स्क्वेअर, थ्रीडी, टायटॅनिक, क्रेकलिंग, जम्बो क्रेकलिंग आदी कमी आवाजाचे फटाके आहेत. तसेच सनड्रॉपसारखे कमी आवाजाच्या फटाक्याने प्रदूषण फारच कमी होणार आहे. फॅन्सी फटाक्यांमध्ये फ्लॉवर ड्राप, रेड कास्को, डेजलिंग, क्लासिक डान्स, गार्डन आॅफ हिडन, गोल्ड ब्लिटर आदींसह १५ प्रकारच्या वेगवेगळ्या आवाजाचे फटाके आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनले आहे.
स्वदेशी फटाक्यांची विक्री
फटाका असोसिएशनचे सचिव रमेश बालानी यांनी सांगितले की, व्यापाऱ्यांनी चायना फटाक्यावर अघोषित बहिष्कार टाकला आहे. जास्तीत जास्त फटाके शिवाकाशी येथून मागविण्यात आले आहेत. ९० टक्के कमी डेसिबलचे आहेत. शहरात ११ होलसेल व्यापारी आणि ५०० पेक्षा जास्त किरकोळ व्यापारी विक्री करीत आहेत. होलसेल व्यापारी नामदेव कारवटकर यांनी सांगितले की, यंदा चायना फटक्यांना दूर सारून देशात निर्मित फटाक्यांच्या विक्रीवर जास्त भर आहे. गांधीबाग, सेंट्रल एव्हेन्यू, इतवारी रोड या भागात दुकाने सजली आहेत.