नाते माणुसकीचे!
By admin | Published: January 1, 2015 01:28 AM2015-01-01T01:28:26+5:302015-01-01T01:28:26+5:30
नात्यांचे संदर्भ आता पूर्वीसारखे राहिले नाही़ त्यात आता व्यवहार शिरला आहे़ परंतु काही लोक या व्यवहारी जगातही नात्यांची वीण घट्ट धरून उभे आहेत आणि या लोकांमुळेच हे जग
नागपूर : नात्यांचे संदर्भ आता पूर्वीसारखे राहिले नाही़ त्यात आता व्यवहार शिरला आहे़ परंतु काही लोक या व्यवहारी जगातही नात्यांची वीण घट्ट धरून उभे आहेत आणि या लोकांमुळेच हे जग अजूनही सुंदर भासत आहे़ ऋणाली राऊतसाठी रेल्वेस्थानकावरील कुलींनी जे केले ते या सुंदरतेत भर घालणारेच आहे़
आज ऋणाली आनंदात असली तरी तिचा पूर्वार्ध असा आनंदी नव्हताच़ १० वर्षापूर्वी नागपूर रेल्वेस्थानकावर राजकुमार राऊत नावाचा कुली काम करीत होता. अचानक त्याचा मृत्यू झाला. यावेळी त्याची पत्नी ऋणालीला दीड वर्षाची मुलगी होती. तिच्या सासरच्या मंडळींनी मदत करण्याऐवजी तिला त्रास दिला. अशा वेळी तिने धुणीभांडी करून आपले आणि आपल्या मुलीचे पालनपोषण केले. सर्व कुली बांधव तिला नेहमीच भेटून आर्थिक मदत करायचे.
रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करून सर्व कुली बांधवांनी ऋणालीला तिच्या पतीचा कुलीचा बिल्ला मिळवून दिल्याचे सेंट्रल रेल्वे भारवाहक संघाचे अध्यक्ष माजीदभाई यांनी सांगितले. कुली बांधवांनी मदत केली नसती तर आपण कधीच या जगाचा निरोप घेतला असता, अशी भावना ऋणालीने व्यक्त केली. आठ दिवसांपासून ती कुली बांधवांच्या खांद्याला खांदा लावून रेल्वेस्थानकावर कुलीचे काम करीत आहे.
एखादा कुली आजारी असला. कुठल्याही वैयक्तिक अडचणीत सापडला की रेल्वेस्थानकावरील इतर कुली जात-पात, धर्म न पाहता त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. जाती-धर्माच्या नावावर रक्तपात सुरू असताना नागपूर रेल्वेस्थानकावरील कुलींचा आदर्श सर्वांनी घ्यावा, असेच त्यांचे कार्य आहे. हिंदू, मुस्लीम, बौद्ध अशा सर्वच जाती धर्मातील १५५ कुली बांधव येथे गुण्या गोविंदाने काम करीत आहेत. मुस्लीम बांधवांचा मोहर्रम असो, बौद्ध बांधवांचा १४ एप्रिल, धम्मचक्र प्रवर्तन दिन असो, सर्वच कुली एकत्र येऊन तो साजरा करतात.
एखादा कुली अडचणीत असल्याचे समजताच सर्व कुली त्याच्या मदतीला धावून जातात. रेल्वेस्थानकावरील कुलींची ही एकता पाहून जाती धर्माच्या नावाखाली हिंसाचार घडवून आणणाऱ्या समाजकंटकांनी या कुलींपासून धडा घेण्याची गरज आहे.