रेमडेसिविरच्या काळ्याबाजारात नगरसेवकाचा नातेवाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:09 AM2021-04-24T04:09:17+5:302021-04-24T04:09:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला बेलतरोडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला बेलतरोडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री बेड्या ठोकल्या.
त्यांच्याकडून सात इंजेक्शन आणि रोकड जप्त करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यात एका भाजपा नगरसेवकाच्या नातेवाईकाचाही समावेश असल्याची चर्चा आहे. या कारवाईमुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे.
मनोज वामनराव कामडे (वय ४०, रा. जुनी शुक्रवारी), अतुल भीमराव वाळके (वय ३६, रा. आयुर्वेदिक ले-आऊट), पृथ्वीराज देवेंद्र मोहिते (वय ३६, रा. रहाटे काॅलनी), अनिल वल्लभदास ककाणे (वय ५२, रा. टेलिफोन एक्सचेंज चौक) आणि अश्विन देवेंद्र शर्मा (वय ३२, रा. गावंडे ले-आऊट, नरेंद्रनगर), अशी या टोळीतील भामट्यांची नावे असून, कामडे आणि वाळके या टोळीचे सूत्रधार असल्याचे समजते.
आरोपी वाळके आणि कामडे यांच्याकडे रेमडेसिविर इंजेक्शन असून, ते त्याची ब्लॅकमार्केटिंग करीत असल्याची माहिती बेलतरोडी पोलिसांना कळली. त्यानुसार अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप झळके, उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलतरोडीचे ठाणेदार विजय आकोत यांनी कारवाईचा सापळा रचला. त्यानुसार आरोपी कामडेवर पोलिसांनी नजर रोखली. सायंकाळी तो वर्धा मार्गावर रेमडेसिविर घेऊन आला. तो एका ग्राहकाला ती विकणार होता. पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्या गाडीची डिक्की तपासली असता त्यात तीन रेमडेसिविर सापडले. नातेवाईक भरती असल्यामुळे त्याला ते देत असल्याचे कामडेने सांगितले. कोणता नातेवाईक, कुठे आहे, या प्रश्नावर त्याने थाप मारली. पोलिसांनी संबंधित इस्पितळात चौकशी केली असता, कामडे खोटे बोलत असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी त्याला खाक्या दाखविला. त्यानंतर त्याच्या घराची झडती घेतली. तेथेही दोन इंजेक्शन सापडले, नंतर कामडेने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अतुल वाळकेला ताब्यात घेतले. त्याच्याकडे दोन रेमडेसिविर सापडले. या दोघांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून आणखी मोहिते, ककाणे आणि शर्मा या तिघांना ताब्यात घेतले.
---
राजकीय वर्तुळात खळबळ
त्यांची रात्रीपर्यंत पोलीस चाैकशी करीत होते. प्राथमिक चाैकशीत कामडे नगरसेवकाचा नातेवाईक आणि वाळके बांधकाम व्यावसायिक असल्याचे पुढे आल्याचे समजते. दरम्यान, रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी नगरसेवकाचा नातेवाईक संचालित करीत असल्याचे वृत्त शहरभर पसरल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली. पोलीस मात्र यासंबंधाने स्पष्ट बोलायला तयार नव्हते.
---
४५ हजारात एक इंजेक्शन
सूत्रांच्या माहितीनुसार, एका रेमडेसिविरसाठी रुग्णाचे नातेवाईक पायपीट करीत असताना, या टोळीचे म्होरके कामडे आणि वाळके यांनी हे इंजेक्शन कुठून आणले, ते सांगायला तयार नव्हते. मात्र, त्यांनी एक इंजेक्शन ४५ हजारात विकणार होतो, अशी कबुली दिल्याचे समजते.
---