मृतांच्या नातेवाईकांना आणाव्या लागतात बर्फाच्या लाद्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 11:31 AM2020-08-06T11:31:20+5:302020-08-06T11:33:01+5:30
कामठी उपजिल्हा रुग्णालयातील बर्फ तयार करणारी फ्रिजर मशीन गत चार वर्षांपासून बंद आहे. परिणामी मृताच्या नातेवाईकांना दरवेळी पदरमोड करून बर्फाच्या लाद्या विकत आणाव्या लागत आहेत.
सुदाम राखडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कामठी उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात शीतगृह तयार करण्यात आले आहे. येथील बर्फ तयार करणारी फ्रिजर मशीन गत चार वर्षांपासून बंद आहे. परिणामी मृताच्या नातेवाईकांना दरवेळी पदरमोड करून बर्फाच्या लाद्या विकत आणाव्या लागत आहेत. यासाठी त्यांना बाराशे ते पंधराशे रुपयांचा फटका बसतो.
कामठी शहरातून नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे कामठी, मौदा, खात, पारशिवनी, मनसर खापरखेडा या परिसरातील अपघात, वीज कोसळणे, आत्महत्या, खून तसेच अन्य घटनांमधील मृतदेह कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणले जातात. काही कारणास्तव तपासणीला विलंब होत असल्याने मृतदेह सुरक्षित रहावेत म्हणून या रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात शीतगृहाची निर्मिती केली आहे. या शीतगृहातील फ्रिजर मशीनमध्ये दोन मृतदेह ठेवण्याची सोय आहे. मात्र ही मशीन गेल्या चार वर्षापासून बंद आहे.
शवविच्छेदन गृहात ठेवलेले मृतदेह उत्तरीय तपासणीअभावी कुजले असल्याने त्याची दुर्गंधी सुटते. त्या दुर्गंधीचा परिसरात राहणाऱ्या तसेच या भागातून रोज ये-जा करणाºया नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
रुग्णालय प्रशासनाने ही मशीन दुरुस्त करण्याची वरिष्ठांकडे अनेकदा मागणी केली आहे. परंतु कुणीही त्याची गांभीर्याने दखल घेत नाही. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन वर्षापूर्वी कन्हान नदीकाठाने एका अनोळखी महिलेचा मृतदेह मिळाला होता. मृताची ओळख होईपर्यंत प्रेत शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आले होते. अनोळखी मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी कुणीही बर्फाच्या लाद्याची सोय करीत नसल्याने तो मृतदेह तसाच पडून असतो. यासंदर्भात परिसरातील महिलांनी मोर्चा काढून उपजिल्हा रुग्णालयात धडक दिली होती. त्या दरम्यान कामठी नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष रणजित सफेलकर यांनी महिलांना शांत करून कुजलेल्या प्रेतावर अंत्यसंस्कार केले होते. उपजिल्हा रुग्णालय शवगारातील फ्रिजर मशीनची समस्या त्वरित सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कामठी उपजिल्हा रुग्णालयातील शवागृहात अद्यावत फ्रिजर मशीन व विविध साहित्याच्या खरेदीसाठी निधी मंजूर झाला आहे. लॉकडाऊनमुळे या कामात व्यत्यय आला आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल.
- डॉ. श्रद्धा भाजीपाले,
प्रभारी अधीक्षक, कामठी उपजिल्हा रुग्णालय