‘महाडीबीटी’ याेजनेतील अटी शिथिल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:08 AM2021-05-30T04:08:46+5:302021-05-30T04:08:46+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : काेराेना संकटामुळे शेतकऱ्यांनासुद्धा अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरीप हंगाम ताेंडावर असतानाच बी-बियाणांची जुळवाजुळव ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : काेराेना संकटामुळे शेतकऱ्यांनासुद्धा अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरीप हंगाम ताेंडावर असतानाच बी-बियाणांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. दरवर्षी कृषी विभागामार्फत अनुदानावर शेतकऱ्यांना बियाणे मिळत हाेते; परंतु शासनाने महाडीबीटी याेजना सुरू करीत आधी पूर्ण रक्कम भरा, नंबर लागला तर बियाणे मिळेल, अन्यथा नाही, अशी किचकट अट घातल्याने ही याेजना शेतकऱ्यांसाठी डाेकेदुखी ठरत आहे. त्यामुळे शासनाने याेजनेतील अटी त्वरित शिथिल कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रमाेद घरडे यांच्यासह शेतकऱ्यांची आहे.
सद्य:स्थितीत लाॅकडाऊनमुळे संगणक केंद्र बंद आहेत. आता शेतीची पूर्वमशागत करावी की ऑनलाइन नाेंदणीसाठी भटकावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमाेर आहे. त्यातही पूर्ण रकमेचा भरणा, त्यानंतर नंबर लागला तर ठीक, नाही तर पुन्हा खासगी कृषी केंद्र संचालकांना हातपाय जाेडा, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे महाडीबीटी याेजनेंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवणारा तुघलकी निर्णय राज्य शासनाने त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी प्रमाेद घरडे यांनी केली आहे. मागील वर्षी महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांना माेठा दिलासा मिळाला हाेता, असेही त्यांनी म्हटले आहे.
गेल्या दीड वर्षापासून काेराेनामुळे सगळेच त्रस्त आहेत. अशा संकटकाळात शेतकऱ्यांना जगविणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सहज सवलतीच्या दरात बियाणे उपलब्ध हाेण्यासाठी महाडीबीटी याेजनेतील अट रद्द करावी, अशी मागणी प्रमाेद घरडे, बाबा सायरे, राजेश गायधने, नरेश चाैधरी, याेगेश केळझरकर, लालू कुंबले आदींनी केली आहे.
...
महाडीबीटी याेजना चांगली आहे; परंतु सध्या काेराेनामुळे ऑनलाइन सुविधा पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास हाेत आहे.
- प्रदीप पाेटदुखे, तालुका कृषी अधिकारी, कुही.