४ हजारांत खरेदी केलेल्या बालकामगाराची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 10:27 PM2021-02-12T22:27:09+5:302021-02-12T22:29:38+5:30
child laborer, nagpur news काँग्रेसनगर परिसरातील एका डेअरी व्यावसायिकाच्या घरून महिला व बाल विभागाने एका बालकामगाराची सुटका केली. गुरुवारी सायंकाळी बाल संरक्षण विभाग आणि पाेलिसांच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेसनगर परिसरातील एका डेअरी व्यावसायिकाच्या घरून महिला व बाल विभागाने एका बालकामगाराची सुटका केली. गुरुवारी सायंकाळी बाल संरक्षण विभाग आणि पाेलिसांच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. पीडित बालक मूळचा राजस्थानच्या बारमुरा जिल्ह्यातील रहिवासी असून, ४ हजार रुपये देऊन खरेदी करून आणल्याचे सांगण्यात येत आहे. ताे ११ वर्ष ६ महिन्यांचा आहे. त्याच्याकडून जनावरांचे शेण उचलणे, गाेठ्यात साफसफाई करण्याचे काम करून घेतले जात हाेते.
याबाबतची माहिती बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांना मिळाली. त्यांनी याबाबत जिल्हा महिला व बाल अधिकारी अपर्णा काेल्हे आणि कामगार विभाग यांना लिखित सूचना दिली. यानंतर जिल्हा संरक्षण कक्ष, कामगार विभाग आणि पाेलीस विभाग यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी ४ वाजता काॅंग्रेसनगरस्थित डेअरी व्यवसायी माणिकलाल जैन यांच्या घर आणि गाेठ्यात पाेहोचले. तेथे पीडित बालकाशी बाेलून त्याचे म्हणणे नाेंदविण्यात आले. बाल संरक्षण अधिकारी पठाण यांच्यानुसार या मुलाला १५ दिवसांपूर्वी राजस्थानहून आणण्यात आले हाेते. मुलाला काम लावून देताे, असे सांगून आईला ४ हजार रुपये देत त्याला नागपूरला आणले. त्यानंतर बालकाकडून गाेठ्यात काम करून घेतले जात आहे. या प्रकरणात आराेपी जैन याच्याविराेधात बाल कामगार कायदा व बाल न्याय अधिनियमाअंतर्गत धंताेली पाेलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्वाईमध्ये अधिकारी पठाण, कामगार अधिकारी संजय धात्रक, लक्ष्मण राठोड, निशांत शिंगाडे, विनोद शेंडे, साधना हटवार, पूजा कांबळे, पीएसआई देवाजी नरवटे आदींचा सहभाग हाेता.
दाेन बालक आधीच पळाले
पीडित मुलाने दिलेल्या माहितीनुसार, जैन याच्या गाेठ्यामध्ये यापूर्वी दाेन बालक काम करीत हाेते. मात्र काही दिवसांपूर्वी ते पळून गेल्याचे या मुलाने सांगितले.