दानात दिलेल्या भावंडाची सुटका
By Admin | Published: January 11, 2016 02:31 AM2016-01-11T02:31:51+5:302016-01-11T02:31:51+5:30
जुन्या काळात आश्रमाला, मंदिराला दानात मुले देण्याची प्रथा होती. बाल संरक्षणासंदर्भातील कायद्यामुळे या प्रथेवर अंकुश ठेवण्यात बऱ्यापैकी यश आले आहे.
जिल्हा बाल संरक्षण विभागाची कारवाई
नागपूर : जुन्या काळात आश्रमाला, मंदिराला दानात मुले देण्याची प्रथा होती. बाल संरक्षणासंदर्भातील कायद्यामुळे या प्रथेवर अंकुश ठेवण्यात बऱ्यापैकी यश आले आहे. असे असतानाही नागपूरसारख्या शहरात एका आश्रमाला दानात दिलेली भावंडे आढळली आहे. जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्याने या आश्रमात धाड टाकून या भावंडाची सुटका केली आहे.
या दोन्ही मुलांना आश्रमात दान दिले असल्याचे आश्रमाकडे शपथपत्र आहे. बाल संरक्षण कायद्यांतर्गत मुलांना दान देणे हा गुन्हा असल्याने ही कारवाई करण्यात आली.
नरेंद्रनगर परिसरातील एका आश्रमात दोन मुले अडचणीत असल्याची तक्रार चाईल्ड लाईन संस्थेच्या अमरजा खेडकर यांनी जिल्हा बाल कल्याण समितीकडे केली होती.
बाल समितीने यासंदर्भात चौकशीचे आदेश जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांना दिले होते. बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, कर्मचारी विनोद शेंडे, सामाजिक सुरक्षा सेलचे सहायक पोलीस निरीक्षक चौधरी व चाईल्ड लाईनच्या पथकाने आश्रमात धाड टाकून दोन्ही मुलांना सोडविले. याप्रकरणी करण्यात आलेल्या तपासणीत आश्रमाकडे मुले दान दिले असल्याचे शपथपत्र आढळले. ही दोन्ही मुले छत्तीसगड येथील राजनांदगावची आहे. दोघेही भाऊ-बहीण आहे.
मुलगा ६ वर्षाचा आहे, तर मुलगी ७ वर्षाची आहे. सध्या ही दोन्ही मुले श्रद्धानंद आश्रमात आहेत. मंगळवारी दोघांनाही बाल कल्याण समितीसमोर सादर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)