सलाम टोळीतील गुन्हेगारांच्या मोक्कामुक्तीचा आदेश रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:18 AM2021-01-08T04:18:16+5:302021-01-08T04:18:16+5:30
नागपूर : अकोला येथील सलाम टोळीचा म्होरक्या सलाम खान करीम खान याच्यासह एकूण सहा गुन्हेगारांना मोक्कामुक्त करण्याचा वादग्रस्त आदेश ...
नागपूर : अकोला येथील सलाम टोळीचा म्होरक्या सलाम खान करीम खान याच्यासह एकूण सहा गुन्हेगारांना मोक्कामुक्त करण्याचा वादग्रस्त आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवैध ठरवून रद्द केला. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांनी गुन्हेगारांना हा दणका दिला.
इतर आरोपींमध्ये शेख मेहमूद शेख मेहबुब, नासीरखां ऊर्फ बाबा धाबेकर, नौशाद खां गफ्फार खां, अयुब खां ऊर्फ लाला युनूस खां व रहीम खां शकुर खां यांचा समावेश आहे. अमरावती येथील मोक्काच्या विशेष सत्र न्यायालयाने ८ मे २०१५ रोजी वादग्रस्त आदेश जारी केला होता. त्याविरुद्ध राज्य सरकारने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. ते अपील मंजूर करण्यात आले. संबंधित गुन्हेगार व्यापारी, व्यावसायिक आदींकडून हप्ता वसुली करतात आणि हप्ता देण्यास नकार देणाऱ्यांना जबर मारहाण करतात. पोलिसांनी या टोळीतील गुन्हेगारांविरुद्ध १० वर्षांत ३४ गुन्हे नोंदविले. सत्र न्यायालयाने आरोपमुक्त केल्यानंतर ते पुन्हा जोमाने गुन्हे करायला लागले. ॲड. तहसीन मिर्झा यांनी सरकारच्या वतीने कामकाज पाहताना ही माहिती उच्च न्यायालयाला दिली.