सुरनदी आणि पेंचच्या कालव्याला पाणी सोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:07 AM2021-04-10T04:07:44+5:302021-04-10T04:07:44+5:30
खात : मौदा तालुक्यातील सूर नदीपात्र कोरडे पडल्याने खातसह परिसरातील बहुतांश गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. पाण्याच्या ...
खात : मौदा तालुक्यातील सूर नदीपात्र कोरडे पडल्याने खातसह परिसरातील बहुतांश गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. पाण्याच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे येथील पाणी पुरवठा योजना प्रभावित झाल्या आहेत. या परिसरातील गावांना एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. सूर नदीवर धर्मापुरी ते महालगाव या सात किलोमीटर अंतरावर कमीत कमी १५ ते २० गावांच्या पाणी पुरवठा योजना आहेत. या नदीवर पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करून १० ते १५ किलोमीटरपर्यंत पाणी नेले जाते. मात्र, मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सूर नदी कोरडी पडली आहे. पेंच प्रकल्पाचे पाणी पेंचच्या मुख्य कालव्याला व नदीला सोडले तर याचा फायदा पाणी पुरवठा योजनांना होईल, असे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
एकही बंधारा नाही
सूर नदीवर परिसरातील धर्मापुरी ते महालगावपर्यंत एकही बंधारा शासनाने बांधला नाही. जलयुक्त शिवार योजनेतून नदीवर बंधारा बांधला तर याचा फायदा या परिसरातील जनतेला होईल. बंधारा बांधण्याची मागणी या परिसरातील जनतेची आहे. परंतु रेती चोरट्यांचा याला विरोध आहे. नदीवर बंधारा बांधला तर पाणी जमा राहील. त्यामुळे त्यांना रेतीची चोरी करणे शक्य होणार नाही.
...या गावांना होतो पाणी पुरवठा
सूर नदीवरून धर्मापुरी, रेवराल, श्रीखंडा, नवरगाव, मोरगाव, तांडा, सिरसोली, देवमुंढरी, वायगाव, मुरमाडी, पिंपळगाव, खात या गावांना पाणी पुरवठा केला जातो.