नागपूरच्या संत्रा मार्केट परिसरातील खोवा आणि पान विक्रेत्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:42 AM2018-02-18T00:42:52+5:302018-02-18T00:45:38+5:30
नागपूरच्या संत्रा मार्केट परिसरातील खोवा आणि पान विक्रेत्यांच्या मागणीची दखल घेत महामेट्रोने व्यापाऱ्यांकरिता पर्यायी बाजारपेठेची व्यवस्था केली आहे. त्यामुळे खोवा आणि पान विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरच्या संत्रा मार्केट परिसरातील खोवा आणि पान विक्रेत्यांच्या मागणीची दखल घेत महामेट्रोने व्यापाऱ्यांकरिता पर्यायी बाजारपेठेची व्यवस्था केली आहे. त्यामुळे खोवा आणि पान विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे.
दुकानांचे उद्घाटन शनिवारी महापौर नंदा जिचकार आणि महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रकल्प संचालक महेशकुमार, माजी महापौर प्रवीण दटके आणि सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम उपस्थित होते.
संत्रा मार्केट परिसरात मेट्रोचे काम होऊ घातल्याने तेथील विक्रेत्यांची गरज लक्षात घेता हा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला होता. मनपाने जवळच असलेल्या हिंदी भाषा शाळेच्या परिसरात जागेची व्यवस्था केल्याने महामेट्रोने बांधकामाला सुरुवात केली. १५५० चौ.मी. क्षेत्रफळ इतक्या जागेत एकूण १०२ दुकाने आणि ९ गोदामाचे बांधकाम करण्यात आले आहे. तसेच खोवा आणि पान विक्रेत्यांची गरज लक्षात घेता एक हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात आली. सोबतच पुरुष आणि महिला व्यावसायिकांकरिता स्वछतागृहाचे निर्माण केले. वाहनतळ, वीजपुरवठा आणि सुरक्षा भिंतीसारख्या मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.