नागपूरकरांना दिलासा : मालमत्ताकरात कोणतीही वाढ नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 09:10 PM2020-01-15T21:10:46+5:302020-01-15T21:11:47+5:30
महापालिका २०२०-२१ या वित्त वर्षात मालमत्ता करात कोणत्याही प्रकारची करवाढ करणार नाही. सन २०१९-२० या वर्षातील प्रचलित दरानुसार कर आकारणी केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका २०२०-२१ या वित्त वर्षात मालमत्ता करात कोणत्याही प्रकारची करवाढ करणार नाही. सन २०१९-२० या वर्षातील प्रचलित दरानुसार कर आकारणी केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. सर्वसाधारण सभेत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम १२६(अ)अंतर्गत मालमत्ता करात समाविष्ट असलेले कर कलम ९९ अंतर्गत पुढील आर्थिक वर्षात महानगरपालिके द्वारे आकारण्यात येणाऱ्या कर आकारणीच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली. सन २०१९-२० या वर्षात सामान्य कर, साफसफाई, शिक्षण कर, विशेष सफाई पाणीपुरवठा, विशेष सफाई रोजगार हमी कर, रस्ते, दिवाबत्ती, अग्निशमन, वृक्ष कर अशा स्वरूपाची कर आकारणी ज्या दराने करण्यात आली होती, त्यानुसार पुढील वर्षात कर आकारणी केली जाणार आहे.
या प्रस्तावाला २० फेब्रुवारी २०२० पर्यंत महापालिका सभागृहाची मंजुरी घेणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे प्रस्तावात राज्य शासनाच्या शिक्षण कर, रोजगार हमी कर व मोठ्या निवासी इमारतींवरील करांच्या दरामध्येसुद्धा शासनातर्फे कोणत्याही स्वरूपाचा बदल केलेला नाही. पुढील आर्थिक वर्षात कोणत्याही स्वरूपाची वाढ प्रस्तावित केलेली नाही. करात कोणत्याही स्वरूपाची करवाढ प्रस्तावित नसल्याने शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
स्थायी समितीतून आठ सदस्य निवृत्त
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २०(३)अन्वये स्थायी समितीच्या आठ सदस्यांचा कालावधी १ मार्च २०२१ रोजी संपुष्टात येणार आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांत लखन येरवार, विजय चुटेले, श्रद्धा पाठक, वर्षा ठाकरे, स्नेहल बिहारे, निरंजना पाटील, जिशानमुमताज मों. इरफान अन्सारी आदींचा समावेश आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागेवर नवीन सदस्यांची सभागृहात नियुक्ती केली जाणार आहे. या प्रस्तावाला समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
फायरमन ड्रायव्हरला मुदतवाढ
महापालिकेच्या अग्निशमन विभागातील निवृत्त झालेल्या कंत्राटी १३ फायरमन ड्रायव्हरला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. अग्निशमन विभागात मनुष्यबळ कमी असल्याने नवीन भरती प्रक्रिया होईपर्यंत या कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने स्यायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविला होता.