अर्थ गेले तरी विदर्भाला दिलासा; गृह, उर्जा, जलसंपदा फडणवीसांकडेच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 11:03 AM2023-07-15T11:03:23+5:302023-07-15T11:05:06+5:30
राठोडांना धक्का, धर्मरावबाबांना बळ
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्याला कुटनीती म्हटले त्या राजकीय तडजोडीत त्यांच्याकडील अर्थ व नियोजन खाते नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेले असले तरी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असे गृहखाते तसेच विदर्भ विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची ऊर्जा व जलसंपदा ही खाती फडणवीस यांच्याकडेच कायम राहिल्याने प्रदेशाला दिलासा लाभला आहे.
बहुचर्चित व बहुप्रतिक्षित खातेवाटपात यवतमाळचे संजय राठोड यांना धक्का बसला असून ड्रगिस्ट व केमिस्ट असोसिएशनने केलेल्या तक्रारींच्या पृष्ठभूमीवर त्यांच्याकडील अन्न व औषधी मंत्रालय गडचिरोलीचे
धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे सोपविले गेले आहे. सुधीर मुनगंटीवार या विदर्भातील चौथ्या मंत्र्यांकडील वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय ही खाती कायम राहिल्याने त्यांच्या राजकीय वजनावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.
मागच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुधीर मुनगंटीवार यांच्या रूपात अर्थखाते विदर्भाकडे होते. मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांनी मिळून विदर्भाच्या हक्काचा निधी देण्यात हात सैल सोडला होता. त्यावेळी नागपूरसह विदर्भातील जिल्ह्यांनाच अतिरिक्त निधी दिला जात असल्याची टीकाही झाली. त्यानंतर अजित पवार यांच्या रूपाने
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात हा अतिरिक्त निधी मिळाला नव्हता. आघाडी सरकार कोसळल्यानंतर सत्तेवर आलेले एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अस्तित्वात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने अर्थ व नियोजन खातेही पुन्हा विदर्भाच्या वाट्याला आले. त्यामुळे विदर्भाला पुन्हा न्याय मिळू लागला. आता ते खाते अजित पवार यांच्याकडे गेले असले तरी त्यांचा फडणवीस यांच्याशी चांगला समन्वय असल्याने विदर्भाला अर्थपुरवठ्याचा झरा आटणार नाही, अशी आशा आहे.
अन्न व औषध प्रशासन खात्याची अदलाबदली
अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्याने शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांना फटका बसला. राठोड यांच्याकडील अन्न व औषधी प्रशासन खाते गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीचे प्रतिनिधित्व करणारे धर्मरावबाबा आत्राम यांना देण्यात आले आहे. राठोड यांच्याकडे आता मृद व जलसंधारण खाते उरले आहे.