पूर्व नागपूरच्या दोन हजार भूखंडधारकांना दिलासा
By admin | Published: July 18, 2016 02:34 AM2016-07-18T02:34:47+5:302016-07-18T02:34:47+5:30
पूर्व नागपूरच्या बाह्य भागातील विविध आरक्षण वगळण्यात आल्यानंतर प्रस्तावित डी.पी. रोडचे आरक्षण वगळण्याची मागणी सातत्याने होत होती.
डी.पी. रोडचे आरक्षण रद्द : ३९ ले-आऊटला लाभ
नागपूर : पूर्व नागपूरच्या बाह्य भागातील विविध आरक्षण वगळण्यात आल्यानंतर प्रस्तावित डी.पी. रोडचे आरक्षण वगळण्याची मागणी सातत्याने होत होती. आ. कृष्णा खोपडे यांनी नागरिकांच्या या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला. शेवटी नासुप्रने पूर्व नागपुरातील काही डी.पी. रोडचे आरक्षण वगळण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ येथील सुमारे दोन हजार भूखंडधारकांना होणार आहे.
मौजा भरतवाडा, पारडी, पुनापूर, चिखली येथील सुमारे ३९ ले-आऊट डी.पी. रोडच्या आरक्षणामुळे बाधित होते. येथे ४० वर्षांपासून वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांनी भूखंडांची रजिस्ट्री करून पक्की घरे बांधली होती. मात्र, आरक्षणामुळे संबंधित घरे नियमित होत नव्हती. भूखंड आरक्षित असल्यामुळे बांधकामासाठी बँकेकडून कर्ज मिळत नव्हते. संबंधित मालमत्तेच्या खरेदी विक्रीचे व्यवहार थांबले होते.
नागरिकांच्या या प्रश्नासाठी ३ जुलै २०१६ रोजी हैदराबाद हाऊस येथे बैठक झाली. तीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. कृष्णा खोपडे आदी उपस्थित होते. या बैठकीत संबंधित ३९ ले-आऊटमधील डी.पी. रोडचे आरक्षण वगळण्यावर चर्चा होऊन तसा प्रस्ताव तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता नासुप्रने या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. (प्रतिनिधी)