वाडी नगर परिषदेला दिलासा : विकास कामाविरुद्धचा अर्ज खारीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 08:16 PM2020-01-01T20:16:05+5:302020-01-01T20:18:34+5:30
एका भूखंडावर करण्यात येत असलेल्या विकास कामाविरुद्ध दाखल अर्ज कनिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाने खारीज केल्यामुळे वाडी नगर परिषदेला मोठा दिलासा मिळाला. प्रमोदकुमार अग्रवाल यांनी हा अर्ज दाखल केला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका भूखंडावर करण्यात येत असलेल्या विकास कामाविरुद्ध दाखल अर्ज कनिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाने खारीज केल्यामुळे वाडी नगर परिषदेला मोठा दिलासा मिळाला. प्रमोदकुमार अग्रवाल यांनी हा अर्ज दाखल केला होता.
वाडी नगर परिषदेला संबंधित भूखंडावर विकास काम करण्याचा अधिकार नाही, हे घोषित करण्यासाठी अग्रवाल यांनी या न्यायालयात १५ एप्रिल २०१९ रोजी दावा दाखल केला आहे. त्यात हा अर्ज दाखल करून विकास कामावर मनाईहुकूम देण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली होती. संबंधित भूखंड अग्रवाल यांच्या मालकीचा आहे व त्याचा अग्रवाल यांच्याकडे ताबा आहे, असा दावा अर्जात करण्यात आला होता. नगर परिषदेने लेखी उत्तर सादर करून अग्रवाल यांचे मुद्दे खोडून काढले. अग्रवाल हे शुद्ध हेतूने न्यायालयात आले नाहीत. संबंधित भूखंड नागपूर सुधार प्रन्यासला दान देण्यात आला होता. त्यावर अतिक्रमण होऊ नये म्हणून सौंदर्यीकरणाचे काम केले जात आहे. ही अवैध कृती नाही. या कामासाठी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी टेंडर जारी करण्यात आले आहे, अशी माहिती नगर परिषदेने न्यायालयाला दिली. नगर परिषदेतर्फे अॅड. महेश धात्रक यांनी कामकाज पाहिले.