यंदा जिल्ह्यात पाणी टंचाईचा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:06 AM2021-06-10T04:06:59+5:302021-06-10T04:06:59+5:30
नागपूर : गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात पाणी टंचाईची भीषणता कमी जाणवत आहे. यावर्षी जिल्हा परिषदेने प्रस्तावित केलेल्या टंचाई आराखड्याला ...
नागपूर : गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात पाणी टंचाईची भीषणता कमी जाणवत आहे. यावर्षी जिल्हा परिषदेने प्रस्तावित केलेल्या टंचाई आराखड्याला जिल्हा प्रशासनाने ५० टक्क्याची कपात लावल्यानंतरही जिल्ह्यात पाणी टंचाईची ओरड झाली नाही. विशेष म्हणजे ३० जूनपर्यंत टंचाई आराखड्यातील मंजूर कामे पूर्ण करायची असतात. जूनच्या पहिल्या आठवड्यात टंचाईची ६० टक्के कामे पूर्ण झाल्याचा गोषवारा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने दिला आहे.
जिल्हा परिषदेने टंचाईचा ५१ कोटीचा आराखडा मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठविला होता. परंतु जिल्हा प्रशासनाने ५० टक्केची कपात करीत २४ कोटीच्या कामाला मंजुरी दिली. २४ कोटीच्या कामांमध्ये ६५८ गावांमध्ये ८७५ टंचाई निवारणार्थ उपाययोजना करायच्या होत्या. जिल्ह्यात मे महिन्यापासून कामाला सुरूवात झाली. जूनच्या पहिल्या आठवड्यात विभागाने दिलेल्या गोषवाऱ्यानुसार १४ कोटीची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये नळ योजनेच्या विशेष दुरूस्तीवर १२.८९ कोटी रुपये खर्च झाले आहेत. टँकरद्वारे पाणी पुरवठ्यावर ७१ लाख खर्च झाले आहेत. खासगी विहीर अधिग्रहणावर ३७ लाख रुपयांचा खर्च गोषवाऱ्यात दाखविला आहे. पण गोषवाऱ्यातील प्रत्यक्षात पूर्ण झालेल्या उपाययोजनांच्या कॉलममध्ये शून्य नोंद आहे. याचाच अर्थ ६० टक्के कामे प्रगतीपथावर आहेत.
- नवीन बोअरवेलला मंजुरीच नाही
जिल्हा परिषदेने टंचाई आराखड्यात २५७ नवीन बोअरवेलचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. परंतु एकाही नवीन बोअरवेलला यंदा मंजुरी दिली नाही. पण विंधन विहिरींची विशेष दुरूस्ती (फ्लशिंग) वर यंदा जास्त फोकस करण्यात आला. आतापर्यंत फ्लशिंगची ९१ टक्के कामे पूर्ण झाली आहेत.
- २५ गावात टँकरने पाणी पुरवठा
टंचाई आराखड्यात ४८ गावात टँकरने पाणी पुरवठा प्रस्तावित केला होता. परंतु प्रशासनाने आवश्यकतेनुसार २५ गावात टँकरद्वारे पाणी पुरवठ्याला मंजुरी दिली. हिंगणा, नागपूर व कामठी तालुक्यातच टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला.