धार्मिक उन्माद लोकच खवपून घेणार नाहीत
By admin | Published: October 19, 2015 03:15 AM2015-10-19T03:15:22+5:302015-10-19T03:15:22+5:30
देशात सध्या काही लोक धार्मिक उन्माद घडवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
विचारपूर्वक राज्य करा : सुशीलकुमार शिंदे यांचा सरकारला इशारा
नागपूर : देशात सध्या काही लोक धार्मिक उन्माद घडवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु हा धार्मिक उन्माद देशात चालू शकत नाही. लोकही तो खपवून घेणार नाहीत, तेव्हा राज्यकर्त्यांनी लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता यांचा विचार करून राज्य करावे, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज येथे दिला.
मारवाडी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार सोहळ्यासाठी ते नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. सुशीलकुमार शिंदे म्हणाले, हा देश धर्मनिरपेक्ष आहे. डॉ. आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली असून ती धर्मनिरपेक्ष व लोकतांत्रिक आहे. या धर्मनिरपेक्ष देशात धार्मिक उन्माद चालू देणार नाही. लोकही ते चालू देणार नाही. या धार्मिक उन्मादाच्या विरोधात देशभरातील साहित्यिक त्यांना मिळालेले पुरस्कार परत करीत आहेत. त्याबाबत ते म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याच्या आणि एकूणच चळवळीमध्ये साहित्यिकांची भूमिका ही नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. तेव्हा देशातील साहित्यिक याप्रकारे आपला विरोध प्रकट करीत असतील तर ती साधीसुधी बाब नाही. पुरस्कार परत करणे, राजीनामा देणे हे सरकारसाठी चांगले संकेत नाहीत, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. सनातन वरील बंदीबाबत विचारले असता यापूर्वीच आपण यावर प्रतिक्रिया दिली असल्याचे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले.(प्रतिनिधी)