नाणार प्रकल्प विदर्भातच स्थलांतरित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:10 AM2021-03-08T04:10:04+5:302021-03-08T04:10:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी नाणार प्रकल्प विदर्भातच स्थलांतरित करावा, अशी मागणी केली असून, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी नाणार प्रकल्प विदर्भातच स्थलांतरित करावा, अशी मागणी केली असून, परत एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात आश्वासन दिले होते, त्यांनी याचे पालन करावे, असे या पत्रातून देशमुख यांनी म्हटले आहे.
रत्नागिरीच्या नाणार येथील ३ लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प विदर्भात हलवा, अशा मागणीचे निवेदन देशमुख यांनी २९ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्र्यांना दिले होते. मुख्यमंत्र्यांनी व्यक्तिगत भेटीत हा प्रकल्प विदर्भात स्थलांतरित करू, असे आश्वासन दिल्याचा दावा देशमुख यांनी केला. रत्नागिरीच्या नाणार येथे प्रस्तावित रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्पाला शिवसेनेचा व स्थानिक लोकांचा विरोध आहे. हा प्रकल्प विदर्भात आल्यास उद्योगधंद्यांना एक नवी गती मिळेल तसेच रोजगार निर्मितीला चालना मिळेल. शिवाय विदर्भातील ४० ते ४५ हजार युवकांना प्रत्यक्ष रोजगार व १ लाख युवकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. केंद्र व राज्य शासनस्तरावर पुढाकार घेऊन आपण विदर्भात हा प्रकल्प आणावा व रोजगार निर्मिती करावी, अशी मागणी देशमुख यांनी या पत्रातून केली आहे.
समृद्धी महामार्गाशेजारी पाईपलाईन उभारावी
पानिपत, भटिंडा, दिल्ली, बिना, गोवाहाटी इत्यादी ठिकाणी इनलँड रिफायनरी प्रकल्प आहेत. या सर्व रिफायनरीज समुद्री बंदरांशी पाईपलाईनने जोडल्या आहेत. समृद्धी महामार्गाच्या शेजारीदेखील अशाच प्रकारे विदर्भ ते मुंबई बंदराला जोडणारी पाईपलाईन उभारता येईल. हा प्रकल्प विदर्भात आला तर आजुबाजूच्या राज्यांचादेखील फायदा होईल, असे देशमुख यांनी पत्रात नमूद केले आहे.