उर्वरित ४० टक्के नागरिकांनी लस घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:12 AM2021-09-07T04:12:11+5:302021-09-07T04:12:11+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : तालुक्यातील १८ वर्षांवरील ६० टक्के नागरिकांचे काेराेना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाले असून, ४० टक्के ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : तालुक्यातील १८ वर्षांवरील ६० टक्के नागरिकांचे काेराेना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाले असून, ४० टक्के नागरिक शिल्लक आहेत. त्यांनी स्वत:चे लसीकरण करवून घेत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार बाबाराव तीनघसे यांनी पत्रपरिषदेत केले. त्यांनी तालुक्यातील काेराेना व डेंग्यूचे रुग्ण व लसीकरण याबाबत माहिती दिली.
कुही तालुक्यात १८ वर्षांवरील १ लाख १६ हजार नागरिक असून, यातील ६९ हजार ७१४ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यात ५० हजार ४१४ नागरिकांनी पहिला, तर १४ हजार ८५४ नागरिकांनी दुसरा डाेस घेतला आहे. या लसीचे काेणतेही दुष्परिणाम दिसून आले नाहीत. तालुक्यातील सर्व प्राथमिक आराेग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांत लसींचा पुरेसा साठा आहे, असेही त्यांनी सांगितले. शाळा सुरू करण्याबाबत प्रशासन प्रयत्नरत असून, शिक्षकांचे लसींचे दाेन्ही डाेस पूर्ण हाेणे अत्यावश्यक आहे. १० टक्के शिक्षकांनी अद्यापही लस घेतली नाही, असेही त्यांनी सांगितले.
शून्य ते १३ वर्षे वयाेगटातील बालकांच्या मातांनी लसीकरण करवून घेतल्यास बालकांची राेगप्रतिकारशक्ती वाढत असल्याचे बाबाराव तीनघसे यांनी स्पष्ट केले. तालुक्यात डेंग्यूच्या रुग्णांत वाढ हाेत असून, प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी प्रशासनाने सुचविलेल्या उपाययाेजनांचे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार बाबाराव तीनघसे यांनी केले आहे. पत्रपरिषदेला खंडविकास अधिकारी मनोज हिरुडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय निकम उपस्थित हाेते.
...
मांढळ येथे काेराेनाचा रुग्ण
मांढळ (ता. कुही) येथील सराफा व्यापारी दाेन दिवसांपासून आजारी आहे. त्याच्यावर मांढळ येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात उपचार सुरू हाेते. त्याला काेराेनाची लागण झाल्याचे चाचणी अहवालावरून स्पष्ट झाले, अशी माहिती तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. संजय निकम यांनी दिली. त्याला उपचारार्थ नागपूर शहरातील शासकीय हाॅस्पिटलमध्ये भरती केले आहे. २४ जुलैपासून आजवर कुही तालुक्यात काेराेनाचा एकही रुग्ण नव्हता, असेही डाॅ. संजय निकम यांनी स्पष्ट केले.
...
डेंग्यूचे २०६ रुग्ण
कुही तालुक्यात डेंग्यूचे २०६ रुग्ण असून, यातील ७३ रुग्ण कुही शहर, १३० रुग्ण कुही ग्रामीण व तीन रुग्ण उमरेड तालुक्यातील आहेत. तालुक्यात डेंग्यू चाचणीची साेय नसल्याने सॅम्पल तपासणीसाठी नागपूरला पाठविले जातात. आराेग्य विभागातर्फे गावागावात सर्वेक्षण व जनजागृती केली जात आहे. स्थानिक प्रशासनाला प्रतिबंधात्मक उपाययाेजना करण्याचे निर्देश दिले जात आहे, असेही तहसीलदार बाबाराव तीनघसे यांनी सांगितले.