शासकीय इस्पितळांतूनही गायब होत आहेत रेमडेसिविर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:11 AM2021-05-05T04:11:16+5:302021-05-05T04:11:16+5:30
- स्टाफ नर्स-चिकित्सकांशी झालेल्या चर्चेतून खुलासा, बेलतरोडी पोलिसांनी पकडले होते रॅकेट जगदीश जोशी / लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ...
- स्टाफ नर्स-चिकित्सकांशी झालेल्या चर्चेतून खुलासा, बेलतरोडी पोलिसांनी पकडले होते रॅकेट
जगदीश जोशी /
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय इस्पितळांमध्ये रुग्णांच्या नावाने वितरित झालेली रेमडेसिविर मोठ्या संख्येने काळाबाजार करणाऱ्यांकडे पोहोचत आहेत. रेमडेसिविरच्या काळाबाजारात सहभागी गडचिरोली जिल्हा रुग्णालयातील स्टाफ नर्स पल्लवी मेश्राम प्रकरणातून यासंदर्भातील संकेत मिळाले आहेत. पल्लवीने रुग्णांच्या नावे जारी केलेली ३० इंजेक्शन्स चोरून आपल्या बहिणीच्या नवऱ्याला दिली होती.
२३ एप्रिल रोजी ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्तानंतर स्वघोषित नेते व बोगस समाजसेवकांकडून रेमडेसिविरचा मोठ्याप्रमाणात काळाबाजार होत असल्याचे स्पष्ट झाले होते. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या वृत्ताच्या आधारावर संशयितांवर नजर ठेवण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. त्यानंतर २३ एप्रिलच्याच रात्री बेलतरोडी पोलिसांनी भाजपा नगरसेविकेचा दीर मनोज कामडेला अतुल वाळके, पृथ्वीराज मोहिते, अनिल कांकाणी आणि अश्विन शर्मा यांच्यासोबत अटक केली आणि त्यांच्याकडून ७ रेमडेसिविर जप्त केली होती. अतुल वाळकेला साळी व गडचिरोली जिल्हा रुग्णालयातील स्टाफ नर्स पल्लवी मेश्रामने रेमडेसिविर उपलब्ध करवून दिली होती. पोलिसांनी पल्लवीलाही अटक केली. तिने हॉस्पिटलमधून ३० रेमडेसिविर चोरून अतुल वाळकेला दिल्याचे मान्य केले होते. सव्वातीन हजार रुपये किमतीच्या एका रेमडेसिविरसाठी गरजू लोक ३० ते ३५ हजार रुपये देण्यास तयार होते. अशा स्थितीत एकाच नर्सने ३० इंजेक्शन्स चोरल्याची बाब रुग्णालयाच्या चिकित्सकांनाही कळली नसल्याने पोलीसही चक्रावले होते. चिकित्सकांनी कोविड ड्युटीवर तैनात असल्याचे कारण पुढे करून, तपासणीसाठी नागपूरला येण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी गडचिरोलीला जाऊन त्यांची चौकशी केली.
रेकॉर्डनुसार इंजेक्शनची चोरी झालीच नसल्याचे गडचिरोली जिल्हा रुग्णालयाचे चिकित्सक सांगत आहेत. पल्लवीच्या अटकेनंतरच त्यांना या प्रकरणाची माहिती कळाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जेव्हा या दिशेने तपासणी करण्यात आली तेव्हा, पल्लवी रुग्णांच्या नावावर जारी केलेले इंजेक्शन चोरून आपल्याजवळ ठेवत होती, हे स्पष्ट झाले. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, हॉस्पिटलला ३०० रेमडेसिविर प्राप्त झाली होती. एका बॉक्समध्ये ५ रेमडेसिविर इंजेक्शन्स असतात. पल्लवीचा हॉस्पिटलमध्ये बोलबाला असल्याने, तिने ६ बॉक्स अर्थात ३० रेमडेसिविर एकाचवेळी चोरून अतुल वाळके याला दिली. अतुल व त्याच्या साथीदारांनी त्यातील २३ रेमडेसिविर विकली आणि वाचलेली ७ इंजेक्शन्स पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी भाजपा नगरसेविकेचा दीर मनोज कामडे यांच्यावर नजर ठेवली नसती, तर या रॅकेटचा छडा लागला नसता. पल्लवीने ज्या रुग्णांच्या नावाने रुग्णालयाकडे आलेली रेमडेसिविर चोरली, त्यातील काही रुग्णांचा मृत्यूही झाल्याची चर्चा आहे. या मृत्यूंचा दोषी कोण, हे एक कोडे बनले आहे.
सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली जिल्हा रुग्णालयाच्या धर्तीवर अनेक शासकीय हॉस्पिटलमध्ये अशाच तऱ्हेने रेमडेसिविरचा काळाबाजार होत आहे. ज्या रुग्णांच्या नावे इंजेक्शन जारी केले जाते, ते इंजेक्शन त्या रुग्णाला लावले की नाही, याचा तपास करणारी कोणतीच यंत्रणा उपलब्ध नाही.
------------
नियम पाळले जात नाहीत
नियमानुसार रुग्णाजवळ एक चार्ट ठेवला जातो. त्यात रेमडेसिविर लिहिणारे चिकित्सक आणि देणाऱ्या नर्सची स्वाक्षरी असते. या चार्टवर इंजेक्शनचा कोड नंबरही लिहिला जातो. वापर झाल्यावर रिकामे झालेले वायल चिकित्सक किंवा अधिकाऱ्यांना परत केले जाते. त्यानंतरच नर्सकडे दुसरे इंजेक्शन दिले जाते. या नियमाचे सक्तीने पालन कोणत्याच हॉस्पिटलकडून केले जात नाही. एका मोठ्या शासकीय इस्पितळाच्या वरिष्ठ चिकित्सकानेही या गोष्टींना दुजोरा दिला आहे. एफडीएची निष्क्रियताच रेमडेसिविरचा काळाबाजार फोफावण्याला कारणीभूत असल्याचे मत या चिकित्सकाने, नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केले आहे.
.............