नागपुरात विकताहेत बांग्लादेशातील रेमडेसिविर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:09 AM2021-04-21T04:09:08+5:302021-04-21T04:09:08+5:30
योगेंद्र शंभरकर नागपूर : महाराष्ट्रासह उपराजधानीत रेमडेसिविरची कमतरता आहे. अशा स्थितीत शेकडो रुग्णांचे कुटुंबीय रेमडेसिविरसाठी भटकत आहेत. या भयावह ...
योगेंद्र शंभरकर
नागपूर : महाराष्ट्रासह उपराजधानीत रेमडेसिविरची कमतरता आहे. अशा स्थितीत शेकडो रुग्णांचे कुटुंबीय रेमडेसिविरसाठी भटकत आहेत. या भयावह परिस्थितीला उच्च न्यायालयाने गांभीर्याने घेतले आहे. त्यानंतरही प्रशासन पर्याप्त रेमडेसिविर मिळविण्यात अपयशी ठरले आहे. पण शहरातील काही फार्मा स्टॉकिस्टनी बांगलादेशच्या ढाका येथून मोठ्या रेमडेसिविर आयात केल्याची माहिती आहे. हे विदेशी इंजेक्शन प्रमाणित आहे वा नाही, याची माहिती नाही, पण एक शिशी २० ते २५ हजारांत नागपुरात विकल्या जास्त असल्याची माहिती आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे इंजेक्शन सोमवारी नागपुरातील काही निवडक औषध विक्रेत्यांकडे पोहोचले आहे. हे स्टॉकिस्ट चोरट्या मार्गाने परिचित डॉक्टरांच्या मागणीनुसार २० ते २५ हजारांत विकत आहेत. डॉक्टरांच्या मागणीनंतर स्टॉकिस्टचे डिलिव्हरी बॉय संबंधित खरेदीदारापर्यंत रेमडेसिविर पोहोचवित आहेत.
या रेमडेसिविरची शिशी पांढऱ्या बॉक्सच्या पॅकिंगमध्ये आली आहे. पॅकेटच्या आतील शिशीवर ब्रॅण्डच्या नावासह ढाका, बांगलादेश लिहिले आहे. नागपूरचे काही स्टॉकिस्ट रेमडेसिविर बाहेरही निर्यात करीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. दुसरीकडे प्रशासन उत्पादक कंपन्यांकडून मर्यादित पुरवठा होत असल्याचे सांगून केवळ कोविड हॉस्पिटलला बेडच्या संख्येच्या आधारावर दरदिवशी रेमडेसिविरचे वितरण करीत आहे.
प्रमाणिकरणाची माहिती नाही
या कथित विदेशी रेमडेसिविरच्या प्रमाणिकरणाची माहिती नाही. कोविड रुग्णांच्या उपचारात ‘मेड इन ढाका’ रेमडेसिविर किती फायदेशीर ठरेल, हे विशेतज्ज्ञ सांगू शकेल. या विदेशी रेमडेसिविरची नागपुरात विक्री होत असल्याची अन्न व औषधी प्रशासन विभागाला माहितीच नाही.
एफडीएने पैसे द्यावे, आम्ही मागवून देऊ
एनजीओ कृती समितीचे सचिन बिसेन म्हणाले, प्रशासन आणि एफडीए ‘मेड इन ढाका’ रेमडेसिविरची शहरात विक्री होत असल्याचा इन्कार करीत असेल तर त्यांनी आम्हाला खरेदीसाठी पैसे द्यावेत, ते आम्ही मागवून देऊ.
-तर तपासणी करू
अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त पुष्पहास बल्लाल म्हणाले, काही लोक नेटवरून रेमडेसिविरचा फोटो व्हायरल करीत आहेत. नागपुरातील ढाका येथील रेमडेसिविरची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास चौकशी व तपासणी करू.
मिळत असेल तर सरकारने आयात करावे
अखिल भारतीय फार्मासिस्ट वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष अजय सोनी म्हणाले, देशातील सात रेमडेसिविर उत्पादक कंपन्यांना उत्पादन वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पण उत्पादन वाढेपर्यंत रुग्णांची स्थिती गंभीर होणार आहे. विदेशातून रेमडेसिविर आयात होत असेल तर सरकारने स्वत: खरेदी करून नागरिकांना उपलब्ध करून द्यावे किंवा परवानाधारक औषध व्यावसायिकांना आयात करण्याची परवानगी द्यावी.