नागपुरात कर्करोग पीडितांना ‘मेट्रोनॉमिक’ प्रणालीचा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 10:20 AM2018-10-31T10:20:57+5:302018-10-31T10:26:24+5:30
कर्करोगावर एक महिन्याचा लाखो रुपयांपर्यंत होणारा औषधांचा खर्च केवळ एक हजार रुपयात होईल, अशी पर्यायी औषधे व उपचार पद्धती विकसित करण्यात आली असून ती टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या कर्करोगशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. श्रीपाद बाणवली यांनी तयार केली आहे.
सुमेध वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साधारण ६० ते ७० टक्के कर्करोग रुग्ण उशिरा उपचारासाठी येतात. यातील काही आर्थिक विवंचनेमुळे उपचार घेत नाहीत किंवा चालू असलेले उपचार मध्येच सोडून देतात. यावर मात करण्यासाठी एक महिन्याचा लाखो रुपयांपर्यंत होणारा औषधांचा खर्च केवळ एक हजार रुपयात होईल, अशी पर्यायी औषधे व उपचार पद्धती विकसित करण्यात आली. ही उपचार पद्धती टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या कर्करोगशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. श्रीपाद बाणवली यांनी तयार केली आहे. नागपुरात विशेषत: मुख कर्करोगाच्या रुग्णांमध्ये ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, त्यांच्यामध्ये या प्रणालीचे आश्चर्यकारक बदल दिसून आले आहेत. ही ‘मेट्रोनॉमिक’ औषध प्रणाली कर्करोगाच्या रुग्णांसाठी दिलासा देणारी ठरत आहे, अशी माहिती प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया यांनी दिली.
डॉ. मानधनिया म्हणाले, भारतात दरवर्षी कर्करोगामुळे १० लाख रुग्णांचा मृत्यू होतो. देशातील इतर राज्याच्या तुलनेत या रोगाच्या अकाली मृत्यूमध्ये महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. यात ‘हेड अॅण्ड नेक कॅन्सर’मध्ये विदर्भ ‘राजधानी’ ठरत असून, नागपुरात इतर कर्करोगाच्या तुलनेत याचे २२.७ टक्के रुग्ण आहेत. ५० टक्के कर्करोगाला तंबाखू हे कारणीभूत ठरते. नागपुरात एक लाख लोकसंख्येच्या तुलनेत नव्याने आढळून येणाऱ्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये ४९.४ टक्के पुरुष रुग्ण हे तंबाखूशी संबंधित कर्करोगाचे आहेत, तर यात महिलांची टक्केवारी १८.२ टक्के आहे. विशेष म्हणजे, कर्करोगाचे जे रुग्ण उपचारासाठी येतात त्यात तिसºया व चौथ्या टप्प्यातील रुग्णांची संख्या सर्वाधिक असते. यातील बहुसंख्य रुग्ण हे दारिद्र्य रेषेखालील किंवा दारिद्र्य रेषेवरील असतात.
यामुळे आजारापेक्षा पैसा हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो. परिणामी, काही रुग्ण विनाउपचाराने तर काही अर्धवट उपचार करतात. यावर ‘मेट्रोनॉमिक’ उपचार पद्धती विकसित करण्यास तज्ज्ञांना यश आले आहे. या कार्यासंबंधी विशेष लेख ‘लान्सेट’च्या कर्करोगशास्त्र विषयाच्या वैद्यकीय पत्रिकेतील अंकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. हजारो रुग्णांवर या उपचार पद्धतीचा यशस्वी अवलंबही करण्यात आला आहे.
काय आहे मेट्रोनॉमिक प्रणाली
कमी मात्रांच्या औषधांचा एकत्रितपणे उपायेग करून ‘मेट्रोनॉमिक’ नावाची ही नवीन नियंत्रित अशी उपचार पद्धती आहे. मेट्रोनॉमिक औषध प्रणालीत तोंडाद्वारे गोळ्यांच्या स्वरुपात केमोथेरपी घेता येते. ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या मान्यताप्राप्त औषधांचा वापर केला जातो. या उपचारपद्धतीत रुग्णालयात दाखल व्हावे लागत नाही, किंवा वारंवार रुग्णांवर उपचारासाठी खेटा मारण्याचा रुग्णांच्या नातेवाईकांचा त्रास कमी होतो. औषधांचा रुग्णाच्या प्रकृतीवर काही विपरीत परिणाम दिसून आले तरी त्याचे प्रमाण अत्यल्प असते.
५०० रुग्णांवर उपचार
मुखाच्या कर्करोगाचे साधारण ५०० रुग्णांवर ‘मेट्रोनॉमिक’ औषध प्रणालीचा वापर केला आहे. त्यांच्यामधील बदल समाधानकारक आहेत. परंतु या उपचाराची गरजच पडणार नाही, याची काळजी घेणे प्रत्येकाच्या हाती आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहिल्यास, योग्य जीवनशैली आत्मसात केल्यास व नियमित व्यायाम अंगिकृत केल्यास या आजाराला दूर ठेवणे शक्य आहे.
-डॉ. सुशिल मानधनिया ,
प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ