विद्यापीठाच्या नामांतरणासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या भीम सैनिकांचे स्मरण ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:07 AM2021-01-15T04:07:45+5:302021-01-15T04:07:45+5:30
अनेकांनी दिली प्राणांची आहुती १६ वर्षे चाललेला लढा यशस्वी : आनंद डेकाटे नागपूर : एखाद्या वास्तूला, जागेला थोर पुरुषांचे ...
अनेकांनी दिली प्राणांची आहुती
१६ वर्षे चाललेला लढा यशस्वी :
आनंद डेकाटे
नागपूर : एखाद्या वास्तूला, जागेला थोर पुरुषांचे नाव देण्याचा प्रघात नवा नाही. तो जनसामान्यांच्या आदराचा व जिव्हाळ्याचाही भाग आहे. असे नामकरण केल्याने त्या समाजपुरुषाची महती काळाच्या प्रवाहावर अंकित होत असते व तिचा परिचय येणाऱ्या सर्व पिढ्यांना होणार असतो.
मात्र कधी असेही घडते की, एखादा लढा हा नामांतरासाठीचा न राहता तो त्याला विरोध करण्यासाठी सज्ज झालेल्या समाजघटकांविरुद्धचा, स्वाभिमानाचा बनतो व एका सामाजिक चळवळीचे रूप धारण करीत तब्बल १६ वर्षे चालतो. तो लढा म्हणजे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा होय.
महराष्ट्र विधिमंडळाच्या विधान सभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहात २७ जुलै १९७८ रोजी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव एकमताने पारित झाला. परंतु जातीयवादी मानसिकतेच्या लोकांना हे पटले नाही. त्यांनी याला तीव्र विरोध करीत मराठवाडा पेटविला. दलितांवर अत्याचार सुरू झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला होत असलेला विरोध व दलितांवरील अत्याचार पाहता नागपुरातील आंबेडकरी समाजमन अस्वस्थ झाले होते. याच्या संतप्त प्रतिक्रिया नागपूर शहरात उमटू लागल्या होत्या. ठिकठिकाणी आंबेडकरी युवक, कार्यकर्ते व समाजबांधव रस्त्यावर उतरले होते. ४ ऑगस्ट १९७८ रोजी नागपुरातील आंबेडकरी जनता हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरली होती. इंदोरा येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा शांततेत पार पडला. मोर्चा आटोपून नागरिक समूहाने घराकडे परतत असताना पोलिसांनी या समूहाला लक्ष्य केले. पोलिसांनी कामठी मार्गावरील इंदोरा १० नंबर पूल परिसरात आंबेडकरी जनतेवर गोळीबार केला. ४ व ५ ऑगस्ट असे दोन दिवस पोलिसांचा धुडगूस सुरू होता. पोलिसांच्या या गोळीबारात ५ भीमसैनिक शहीद झाले. यात अविनाश डोंगरे या बालकाचाही समावेश होता. या गोळीबारात रतन मेंढे, शब्बीर हुसेन फजल हुसेन, किशोर बाळकृष्ण काकडे, अब्दुल सत्तार, बशीर अली हे शहीद झाले. पोलिसांच्या गोळीबारात अनेक निरपराध नागरिक प्रामुख्याने तरुण जखमी झाले होते. कुणाच्या हातात, कुणाच्या पायात, जांघेत, तर कुणाच्या पोटात गोळी लागून ते जखमी झाले होते. यानंतर पुढच्या वर्षी ६ डिसेंबर रोजी १९७९ रोजी पुन्हा मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या अंमलबजावणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या वेळीही ४ ऑगस्टची पुनरावृत्ती करून पोलिसांनी गोळीबार केला. यात ज्ञानेश्वर बुधाजी साखरे, दिलीप सूर्यभान रामटेके, रोशन बोरकर, डोमाजी भिकाजी कुत्तरमारे हे चार भीमसैनिक शहीद झाले. तर कित्येक जखमी झाले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या प्रकारचे मोर्चे झाले. अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. हजारो भीमसैनिक जखमी झाले. सलग १६ वर्षे हा लढा चालला. अखेर आंबेडकरी जनतेच्या आंदोलनापुढे सरकारला नमते घ्यावे लागले. १४ जानेवारी रोजी १९९४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव अस्तित्वात आले.
बॉक्स
आंदोलनात नागपूरचे विशेष योगदान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात नागपूरचे विशेष योगदान राहिले. नामांतर आंदोलनात पहिले बलिदानही नागपूरनेच दिले. तो दिवस होता ४ ऑगस्ट १९७८. त्या दिवशी नागपुरातील ५ भीमसैनिक पोलिसांच्या पाशवी गोळीबारात शहीद झाले. यासोबतच नामांतर आंदोलनासाठी काढण्यात आलेला ऐतिहासिक लॉँग मार्चसुद्धा नागपूरच्या दीक्षाभूमीवरूनच काढण्यात आला होता.
बॉक्स
त्या भीमसैनिकांच्या
स्मृतीत उभारले शहीद स्मारक
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी महाराष्ट्रात सातत्याने आंदोलन चालले. तब्बल १६ वर्षे हे आंदोलन सुरू होते. या दरम्यान महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनात अनेक भीमसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. ४ ऑगस्ट रोजी १० नंबर पुलावर आंबेडकरी समाज प्रत्येक वर्षी एकत्र येऊन शहीद भीमसैनिकांना आदरांजली वाहत असतो. पुढे महापालिकेनेही याची दखल घेत नामांतर आंदोलनातील शहीद भीमसैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शहीद स्मारक उभारले. या स्मारकावर नामांतर आंदोलनातील सर्व शहीद भीमसैनिकांची नावे कोरलेली आहेत.