रस्त्यावरील झाडांना सिमेंट, पेव्हर ब्लाॅकपासून माेकळे करा
By निशांत वानखेडे | Published: July 4, 2024 05:56 PM2024-07-04T17:56:56+5:302024-07-04T17:59:38+5:30
Nagpur : मनपा मुख्य अभियंत्यांचे सर्व झाेन अधिकाऱ्यांना निर्देश
नागपूर : रस्त्यांचे सिमेंटीकरण करताना रस्त्यालगतच्या झाडांच्या बुंध्यापर्यंत केलेले सिमेंटीकरण व पेव्हर ब्लाॅक ताबडताेब हटविण्यात यावे, असे निर्देश महापालिकेचे मुख्य अभियंता यांनी सर्व झाेन अधिकाऱ्यांना तसेच विविध विभागाच्या अभियंत्यांना दिले आहेत. या निर्देशाची याेग्य अंमलबजावणी झाल्यास झाडांचे डिचाेकिंग करणाऱ्या तरुणांच्या संघटनांच्या परिश्रमाला यश मिळेल.
महापालिकेतर्फे शहरातील बहुतेक रस्त्यांचे सिमेंटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहेत. हे काम करताना रस्त्यालगतच्या झाडांच्या बुंध्यापर्यंत सिमेंटीकरण केले जाते किंवा पेव्हर ब्लाॅकने रस्त्यांची मुळे पॅक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे झाडांच्या मुळांपर्यंत पाणी, हवा व पाेषण घटक पाेहचण्यास अडथळा निर्माण हाेताे. आवश्यक घटक न मिळाल्याने मुसळधार पाऊस किंवा वादळे आल्यास ही झाडे मुळासकट रस्त्यावर उन्मळून पडण्याच्या घटना नेहमी घडतात. यामुळे वाहतुकीस अडथळा किंवा जनहानी, वित्तहानी हाेण्याचीही शक्यता असते.
हा प्रकार म्हणजे पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे उल्लंघन हाेय. ही बाब लक्षात घेता सर्वाेच्च न्यायालय आणि हरित न्यायाधिकरण यांनी जारी केलेल्या निर्देशानुसार पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक झाडाच्या भाेवती सुमारे १.२० मीटर व्यासाची जागा माेकळी साेडण्याचे निर्देश दिले हाेते. झाडांच्या १.२० मीटरपर्यंत सिमेंटची कामे किंवा पेव्हर ब्लाॅकही लावण्यात येऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
त्यामुळे प्रत्येक झाेनअंतर्गत येत असलेल्या झाडांना सिमेंटपासून मुक्त ठेवणे तसेच सिमेंटीकरण झालेल्या झाडांचे डिचाेकिंग करण्यात यावे, असे निर्देश महापालिकेचे मुख्य अभियंता राजीव गायकवाड यांनी झाेन अधिकाऱ्यांना जारी केले आहेत. यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता, प्रकल्प अभियंता, डिपीडीसी कार्यकारी अभियंता, क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता, वाहतूक कार्यकारी अभियंता, हाॅट मिक्स प्लॅन्ट कार्यकारी अभियंता तसेच उद्यान विभागाचे उपायुक्त यांनाही तसे निर्देश देण्यात आले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून पर्यावरणप्रेमी तरुण सिमेंटीकरण झालेल्या झाडांचा श्वास माेकळा करण्यासाठी झटत आहेत. आदेशाची अंमलबजावणी झाली तर त्यांच्या कार्याला माेठे यश मिळेल.