मतदान प्रक्रियेतील घोळ दूर करा : भाजपची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:18 AM2019-07-27T00:18:41+5:302019-07-27T00:19:43+5:30

मतदार यादीमधील घोळ, मतदान केंद्रावरील गैरसोय, अशा अनेक समस्यांमुळे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांना त्रास सहन करावा लागला होता. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारींची नोंद केली होती. लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीदरम्यान होऊ नये यासाठी मतदान प्रक्रियेतील सर्व घोळ दूर करा, अशी मागणी करणारे निवेदन शुक्रवारी भाजपचे आमदार व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

Remove confusion in voting process: BJP demands | मतदान प्रक्रियेतील घोळ दूर करा : भाजपची मागणी 

मतदान प्रक्रियेतील घोळ दूर करा : भाजपची मागणी 

Next
ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीत आल्या होत्या अडचणी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : मतदार यादीमधील घोळ, मतदान केंद्रावरील गैरसोय, अशा अनेक समस्यांमुळे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांना त्रास सहन करावा लागला होता. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारींची नोंद केली होती. लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीदरम्यान होऊ नये यासाठी मतदान प्रक्रियेतील सर्व घोळ दूर करा, अशी मागणी करणारे निवेदन शुक्रवारी भाजपचे आमदार व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सोपविले. शिष्टमंडळामध्ये आमदार डॉ. मिलिंद माने, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे, आ. विकास कुंभारे, भाजपचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके, सुनील मित्रा, दिलीप गौर, मुकेश साधवानी तसेच सर्व प्रभागांचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात मतदारांशी संबंधित अनेक तक्रारींबाबत अवगत करण्यात आले. लोकसभा निवडणुकीदरम्यान एकाच कु टुंबातील सदस्यांचे वेगवेगळ्या बुथवर मतदान होते. नियमित असणारे केंद्र बदलविण्यात आल्याने नागरिकांना प्रचंड त्रास झाला. मतदारांचे मतदार केंद्र हे त्यांच्या निवासस्थानापासून एक-दोन किमीच्या अंतरावर असणे आवश्यक आहे. मात्र यावेळी अनेक मतदारांचे केंद्र त्यांच्या घरापासून आठ ते दहा किलोमीटर दूर असल्याने मतदानाची टाळाटाळ झाल्याच्या तक्रारीही नागरिकांनी दिल्या होत्या. ही अडचण दूर करण्याची मागणी करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत असंख्य मतदारांचे विधानसभा क्षेत्रच बदलले होते. उत्तर नागपूरच्या मतदारांचे नाव पूर्व नागपूरमध्ये गेल्याच्या तक्रारीही आल्या होत्या. ही बाब निवेदनात नमूद करण्यात आली. मृतांची नावे वगळण्यात यावी, मतदार यादी शुद्ध व्हावी आणि मतदारांच्या मतदान केंद्राची माहिती ८ दिवसांपूर्वी उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणीही भाजपने यावेळी केली.
विशेष म्हणजे भाजपने यापूर्वीही मतदारांच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेबाबत असलेल्या अडचणी दूर करण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यामध्ये नोंदणीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात यावा, ऑनलाईन अर्जात त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्याकरिता बीएलओकडून कोणतीही विचारणा होत नाही. ऑनलाईन अर्जाची प्रिंट मिळण्याची मुभा नही. पोच पावतीची , ट्रॅक नंबरचे प्रिंट काढता येत नाही. ऑनलाईन अर्ज मंजूर होण्याचा कालावधी कमी करावा आणि जुने प्लास्टिक लॅमिनेटेड कार्ड हरवल्यास, खराब झाल्यास, न मिळाल्यास, नवीन कार्ड बनवून मिळण्याची मोठी यंत्रणा उभारण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या होत्या.

Web Title: Remove confusion in voting process: BJP demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.