झिंगाबाई टाकळीतील झोपडपट्टीचे अतिक्रमण हटवा
By admin | Published: May 10, 2017 02:35 AM2017-05-10T02:35:26+5:302017-05-10T02:35:26+5:30
झिंगाबाई टाकळी येथे जवाहरलाल नेहरू अभियानांतर्गत बीएसयुपी योजना राबविली जाणार आहे.
पालकमंत्र्यांचे निर्देश : बीएसयूपी योजना राबविणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: झिंगाबाई टाकळी येथे जवाहरलाल नेहरू अभियानांतर्गत बीएसयुपी योजना राबविली जाणार आहे. परंतु या गाळ्यांच्या योजनेसाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेवर झोपडपट्टीचे अतिक्रमण करण्यात आले आहे. हे अतिक्रमण ३० मे पर्यत हटविण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी नासुप्र सभापती आणि महापालिका आयुक्त यांना दिले.
नागपूर सुधार प्रन्यासच्या सभागृहात आयोजित बैठकीत पालकमंत्र्यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. यावेळी आमदार सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, समीर मेघे, नासुप्रचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, महापालिका आयुक्त अश्विन मुदगल आदी उपस्थित होते.
या झोपडपट्टीच्या जागेवरील १४५ लोकांना बीएसयुपी योजनेंतर्गत गाळे देण्यात येणार आहे. यापैकी ५० जणांनी अद्याप झोपडपट्टीची जागा सोडली नाही. या सर्वांचे स्थानांतरण करून हे अतिक्रमण हटविण्यात यावे. या जागेवर महापालिकेच्या नावाचा फलक लावावा. येथील डीपी रस्त्याबाबतचा निर्णय सभापतींनी घ्यावा, असे निर्देश बावनकुळे यांनी दिले. झुडपी जंगलाची ही जागा महापालिकेला हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
निकृष्ट कामाची चौकशी करा
चिखली अवतार मेहेरबाबा नगर येथे नासुप्रने केलेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रार या भागातील नागरिकांनी केली. तसेच दक्षिण पश्चिम विधानसभा मतदार संघातही नासुप्रने केलेल्या कामाचा दर्जा चांगला नसल्याच्या तक्रारीही पालकमंत्र्यांकडे आल्या आहेत. या कामाचा दर्जा तपासण्याचे निर्देश सभापतींना देण्यात आले.
बेसा-बेलतरोडी येथील जागेची मोजणी करा!
बेसा बेलतरोडी येथील खसरा नं. ७९/१ व ७९/२ या जमिनीवरील ले-आऊटमध्ये ममता सोसायटी आणि भोयर यांच्यातील वाद लक्षात घेता, उपविभागीय अधिक ाऱ्यांच्या निर्देशानुसार जागेची संयुक्त मोजणी करण्याला पोलिसांनी सहकार्य करावे, असे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले. या जागेवर गुंडांनी अतिक्रमण केले आहे. येथील भूखंड धारकांना पैशाची मागणी केली जात असल्याची तक्रार पालकमंत्र्यांकडे करण्यात आली. नागरिकांनी केलेले बांधकाम गुंड पाडतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी मध्यस्थी करून जागेची संयुक्त मोजणी करावी. असे पालकमंत्र्यांनी पोलिसांना सांगितले.
ग्रामीण भागातील
नाले स्वच्छ करा
महापालिका सीमेबाहेरील शहरातून ग्रामीण भागात येणाऱ्या नाल्यांची १० किलोमीटर पर्यत सफाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना देण्यात आले. ग्रामीण भागात जाणाऱ्या १० मोठ्या नाल्यांची सफाई ३० मे पर्यंत करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. नासुप्र आणि सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत ७ रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. पिपळ्यामध्ये जागा नसल्यामुळे ८० फुटाचा रस्ता करणे शक्य नाही. येथे ४० फुटाचा रस्ता आहे. कारण रस्त्याच्या जागेवर पक्की घरे बांधली असल्यामुळे ती हटविणे शक्य नाही. यावर पालकमंत्र्यांनी पर्याय सुचवला व त्यानुसार कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. रमेश इस्टेट घोगली येथील मोकळ्या जागेत बगिचा विकसित करण्याची सूचनाही पालकमंत्री बावनकुळे यांनी केली.