सत्तेत नाही असे समजून मोर्चे काढा
By admin | Published: April 27, 2017 02:20 AM2017-04-27T02:20:56+5:302017-04-27T02:20:56+5:30
शिवसेना सत्तेत आहे, असे समजू नका. लोकहिताच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घ्या, मोर्चे काढा. नागरिकांसाठी लढा द्या.
उद्धव ठाकरे यांचा सल्ला : पदाधिकाऱ्यांनी घेतली मातोश्रीवर भेट
नागपूर : शिवसेना सत्तेत आहे, असे समजू नका. लोकहिताच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घ्या, मोर्चे काढा. नागरिकांसाठी लढा द्या. मोर्च काढले तर मी नाराज होणार नाही. पण मोर्चे काढले नाही तर मात्र मी नक्की नाराज होईल, असा सल्ला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्ध‘ ठाकरे यांनी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिला.
खा. कृपाल तुमाने, माजी आ. आशिष जैस्वाल, माजी जि.प. सदस्य देवेंद्र गोडबोले, जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार, राजू हरणे, तापेश्वर वैद्य, नंदू कन्हेर, दिलीप माथनकर आदींनी बुधवारी दुपारी १ वाजता मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याची तक्रार केली. जिल्हास्तरीय समित्यांमध्ये शिवसेनेला वाटा मिळालेला नाही. विशेष कार्यकारी अधिकारीही बनविण्यात आलेले नाही. आपण सत्तेत आहो की नाही, असे वाटू लागले आहे, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. यावर उद्धव ठाकरे यांनी आपण सत्तेत नाही, असे समजून लोकहितासाठी आक्रमक होण्याचा सल्ला दिला. नागपूर ग्रामीणसाठी डॉ. दीपक सावंत हे संपर्क प्रमुख आहेत. पण ते मंत्री असल्यामुळे व्यस्त असतात. राज्यभरातील निवडणुका आटोपल्या आहेत. नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक बाकी आहे. त्यामुळे पूर्णवेळ संपर्कप्रमुख देण्यात यावा. तसेच आपण स्वत: नागपूर ग्रामीणमध्ये मौदा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घ्यावा, अशी विनंती उद्धव ठाकरे यांना करण्यात आली. (प्रतिनिधी)