तीन दिवसात घरांचे अवैध बांधकाम हटवा : मनपा आयुक्तांची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 01:32 AM2020-06-19T01:32:36+5:302020-06-19T01:35:16+5:30
इमामवाडा वस्तीतील आयसोलेशन रुग्णालयाच्या उत्तरेकडील भिंतीला लागून असलेल्या १३ घरांचे अवैध बांधकाम येत्या दिन दिवसात हटवा, असे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. मनपा प्रशासनातर्फे संबंधित झोपडपट्टीवासीयांना बुधवारी याबाबतची नोटीसही बजावण्यात आली. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इमामवाडा वस्तीतील आयसोलेशन रुग्णालयाच्या उत्तरेकडील भिंतीला लागून असलेल्या १३ घरांचे अवैध बांधकाम येत्या दिन दिवसात हटवा, असे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. मनपा प्रशासनातर्फे संबंधित झोपडपट्टीवासीयांना बुधवारी याबाबतची नोटीसही बजावण्यात आली. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
मनपाच्या मते, प्रभाग क्र. १७-अ मधील आयसोलेशन रुग्णालयाजवळून वस्तीच्या आतमध्ये जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील जागेवर हे अतिक्रमण उभारण्यात आले आहे. ते नियमाच्या विरुद्ध आहे. नागरिकांनी ही अवैध घरे न पाडल्यास मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून अतिक्रमणधारी नागरिकांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या १३ घरांमध्ये जवळपास ७० नागरिक राहत आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हातातला रोजगार हिरावला गेला. संचारबंदी काहीही शिथिल झाली असली तरी, हाताला काम मिळालेले नाही. अशा परिस्थितीत प्रशासनाने आपल्याला बेघर केले तर, मुलाबाळांना घेऊन जाणार कुठे, हा प्रश्न संबंधित नागरिकांना सतावतो आहे. कोरोनाची परिस्थिती आणि पावसाळा बघता प्रशासनाने आपल्याला घरे हटविण्यासाठी तीन महिन्याची मुदतवाढ द्यावी अथवा पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी नगरसेवक विजय चुटेले यांनी आयुक्तांकडे केली आहे.