अवैध धार्मिक स्थळे हटविणार
By admin | Published: May 13, 2015 02:42 AM2015-05-13T02:42:38+5:302015-05-13T02:42:38+5:30
रस्त्यांच्या मध्ये असलेली व वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी अवैध धार्मिक स्थळे हटविण्याची महापालिकेने तयारी केली आहे.
नागपूर : रस्त्यांच्या मध्ये असलेली व वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी अवैध धार्मिक स्थळे हटविण्याची महापालिकेने तयारी केली आहे. यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून येत्या १५ दिवसात संबंधित अवैध धार्मिक स्थळांवर नोटीस चिपकविण्यात येणार आहे. यावर कुणी आक्षेप घेतला तर संबंधित व्यक्तीला स्वत:च्या खासगी जागेवर धार्मिक स्थळ शिफ्ट करण्याचा पर्याय दिला जाणार आहे. यामुळे धार्मिक भावना न दुखावता अवैध धार्मिक स्थळे हटविता येतील. १९ मे पासून झोन स्तरावर ही कारवाई सुरू करण्याचे निर्देश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.
सार्वजनिक ठिकाणे, फूटपाथ, रस्ते आदींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली असल्याच्या तक्रारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना मिळाल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत आयुक्तांनी मंगळवारी झोनच्या सहायक आयुक्तांची बैठक घेतली. या बैठकीत स्थायी अतिक्रमणे हटविण्याचे तसेच अवैध धार्मिक स्थळे हटविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. अवैध धार्मिक स्थळांमुळे वाहतुकीला होणारा अडथळा विचारात घेता उच्च न्यायालयाने महापालिकेला अशा स्थळांची यादी तयार करून ती हटविण्याचे निर्देश दिले होते. याची दखल घेत तत्कालीन आयुक्त श्याम वर्धने यांनी यादी तयार केली होती. शहरात अशी एकूण १५२१ अवैध धार्मिक स्थळ आढळली. पौराणिक व धार्मिक मान्यता विचारात घेता १७ धार्मिक स्थळांना ‘अ’ श्रेणीत टाकण्यात आले. त्यांना हटविण्यात येणार नाही. उर्वरित १५०५ धार्मिक स्थळांना ‘ब’ श्रेणीत टाकण्यात आले. या यादीवर आक्षेप मागविण्यात आले. ७० नागरिकांनी आक्षेप घेतले.
यानंतर आयुक्त हर्डीकर यांनी पदभार स्वीकारला व या विषयावर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांनी पुन्हा एकदा नव्याने यादी तयार करण्याचे व कुणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाही याची काळजी घेण्याची सूचना केली. यादीतील धार्मिक स्थळे का तोडण्यात येत आहे याचे कारणही देण्याचे निर्देश त्यांनी दिले. याबाबत आयुक्त हर्डीकर म्हणाले, न्यायालयाच्या निर्देशाचे पालन केले जात आहे. १५ दिवस मुदतीची नोटीस दिल्यानंतर अवैध धार्मिक स्थळे हटविली जातील. (प्रतिनिधी)