नागपुरातील अनधिकृत बाजाराचे अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 09:44 PM2020-03-20T21:44:55+5:302020-03-20T21:46:30+5:30
धंतोली झोनच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शुक्रवारी महात्मा फुले मार्केट व शहीद मैदान परिसरातील अनधिकृत बाजारात २१ फळविक्रे त्यांनी उभारलेले टिनाचे शेड हटविले, तसेच फूटपाथवरील अतिक्रमण हटविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना फूटपाथवरून चालता येत नसल्याने मनपाच्या प्रवर्तन विभागाने शहरातील रस्ते व फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. धंतोली झोनच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शुक्रवारी महात्मा फुले मार्केट व शहीद मैदान परिसरातील अनधिकृत बाजारात २१ फळविक्रे त्यांनी उभारलेले टिनाचे शेड हटविले, तसेच फूटपाथवरील अतिक्रमण हटविले.
त्यानंतर पथकाने पार्वतीनगर बसथांबा येथील फूटपाथवरील हातठेले जप्त करण्यात आले. तसेच गांधीसागर परिसरातील खाऊ गल्ली लगतचे ठेले हटविण्यात आले. काशीनगर व मनीषनगर येथील अनधिकृत आठवडी बाजारावर नियमित कारवाई करून बंद करण्यात आले आहे.
सहायक आयुक्त किरण बगडे यांच्या मार्गदर्शनात उपअभियंता सुनील गजभिये, नरेंद्र भांडारकर, प्रल्हाद पाटील, प्रफुल्ल फरकासे, पुंडलिक ढोरे आदींनी ही कारवाई केली. यासाठी उपद्रव शोध पथकाची मदत घेण्यात आली.